Suyash Sharma RCB Hero: आयपीएलचा १८ वा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून ३ जून रोजी एकदाही आयपीएल न जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम लढत होईल. त्यामुळे यंदा नव्या संघाला जेतेपद मिळणार आहे. दरम्यान क्वालिफायर वनमध्ये पीबीकेएस विरुद्ध आरसीबीच्या सामन्यात आरसीबीचा फिरकीपटू सुयश शर्मा त्याच्या संघासाठी हिरो ठरला होता. अवघ्या १७ धावा देऊन त्याने ३ महत्त्वाचे बळी टिपले आणि पंजाबची मिडल ऑर्डर मोडून काढली होती. युजवेंद्र चहलसारखा फिरकीपटू आरसीबीने यंदा सोडला असला तरी सुयश शर्माने ही कमतरता भरून काढली. सुयश शर्मासाठी आयपीएलचा हा हंगाम खेळणे सोपे नव्हते. एकेकाळी इंजेक्शन घेऊन मैदानात उतरणारा सुयश शर्मा आरसीबीसाठी हिरो कसा ठरला?
मे महिन्यात आरसीबी बोल्ड डायरीजसाठी मनोगत व्यक्त करताना सुयश शर्माने २०२५ हे वर्ष त्याच्यासाठी कसे संघर्षमय ठरले, याची माहिती दिली. कोलकाता नाईट रायडर्ससाठी २०२३ साली आयपीएलमध्ये पदार्पण करूनही त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नव्हती. तसेच मागच्या दोन वर्षांपासून तो शारीरिक वेदनेमुळे त्रस्त होता. इंजेक्शन घेऊन त्याला मैदानात उतरावे लागत होते.
यावर्षी आरसीबी संघात निवड झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात जेव्हा सरावाची सुरुवात झाली, तेव्हा सुयशचे दुखणे वाढले. नेमके काय झाले? याचा पत्ता लागत नव्हता. आरसीबीच्या फिजिओंनी त्याची तपासणी करून लंडन येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. आरसीबीसाठी पहिलाच हंगाम आणि एकही सामना न खेळलेल्या सुयशला आरसीबीने उपचारासाठी लंडनला पाठवले. त्याचा सर्व खर्च उचलला, अशी माहिती सुयशने दिली.
“मी मोठा खेळाडू नव्हतो. भारताच्या संघासाठीही अद्याप खेळलेलो नाही. तरीही आरसीबीने माझ्यासाठी जे केले ते मी कधीच विसरू शकत नाही. कुणीही विचारत नसताना आरसीबीने मला हात दिला”, अशी भावना सुयशने व्यक्त केली.
सुयशने पुढे सांगितले की, लंडनमध्ये त्याची भेट जेम्स पाइप यांच्याशी झाली. त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे सुयशची काळजी घेतली. “मला तीन ठिकाणी हर्निया झाला होता. या हंगामात मी खेळू शकेल की नाही, याची शाश्वती नव्हती. माझ्यावर तीन सर्जरी करण्यात आल्या. पहिले काही सामने झाल्यानंतर मला खेळता येईल, असे आमचे फिजिओ म्हणाले. संघाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याने मी अगदी भारावून गेलो आणि अगदी व्यवस्थित होऊन मैदानात उतरलो.”
आरसीबीकडून २.६ कोटींमध्ये खरेदी
सुयश शर्माला २०२३ साली केकेआर संघाने ३० लाखात संघात सामील केले होते. पहिल्याच हंगामात सुयशने ११ सामन्यात १० विकेट्स मिळविल्या. २०२४ साली केकेआरने आयपीएलची ट्रॉफी उचलली. मात्र सुयशला संपूर्ण हंगामात फक्त दोन सामने खेळता आले. तसेच एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर केकेआरने सुयशला संघातून मोकळे केले.
२०२५ च्या हंगामासाठी ऑक्शन सुरू असताना आरसीबीने सुयशवर विश्वास दाखवत त्याच्यावर २.६ कोटींची बोली लावून संघात घेतले. तसेच त्याच्या लंडनमधील उपचारांचाही खर्च उचलला.
या हंगामातील कामगिरी कशी राहिली?
चालू हंगामात सुयश शर्माने १३ सामने खेळले आहेत. यात २८८ चेंडू टाकले असून त्यावर ४२३ धावा दिल्या आहेत. तर आतापर्यंत ८ विकेट्स मिळविल्या आहेत. पहिल्या क्वालिफायरचा त्याचा खेळ आतापर्यंतचा सर्वात चांगला खेळ होता. या सामन्यामुळेच आरसीबी संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचला.