Virat Shikhar Hug Video Viral : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून पहिला विजय नोंदवला. या विजयात विराट कोहलीचा महत्त्वाचा वाटा होता, त्याने ७७ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. आता विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सामना संपल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनला मिठी मारताना दिसत आहे.
सामना गमावल्यानंतर शिखर धवन निराश दिसत होता. यावेळी कोहली धवनकडे गेला आणि त्याला मिठी मारली, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर कोहलीही त्याला काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर दोघांमध्ये काही मजा आणि चेष्टा झाली आणि दोन्ही फलंदाज हसताना दिसले. कोहलीची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी अनेक कमेंट्सही केल्या आहेत. या सामन्यात धवनने आपल्या संघासाठी सर्वाधिक ४५ धावा केल्या होत्या.
१०-१५ धावा कमी करणे आणि झेल सोडणे महागात पडले –
बेंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर धवन म्हणाला होता, “हा एक चांगला सामना होता, आम्ही सामन्यात कमबॅक केले होते, त्यानंतर आम्ही हरलो. आम्ही १०-१५ धावा कमी केल्या, मी पहिल्या सहा षटकांमध्ये थोडा संथ खेळलो. त्या १०-१५ धावा कमी करणे आणि झेल सोडणे महागात पडले. विराटने ७० हून अधिक धावा केल्या आणि आम्ही एका क्लास खेळाडूचा झेल सोडला, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. तो झेल आम्ही घेतला असता तर दुसऱ्या चेंडूपासूनच गती आमच्या बाजूने आली असती. पण आम्ही तिथे गती गमावली आणि नंतर आम्हाला किंमत मोजावी लागली. या सामन्यात कोहलीला दोन जीवदान मिळाले, ज्याचा पुरेपूर फायदा घेत त्याने ७७ धावा केल्या.”
हेही वाचा – IPL 2024 : गुजरात टायटन्सला पराभवानंतर आणखी एक धक्का, कर्णधार शुबमन गिलला ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड
खेळपट्टी चांगली दिसत होती पण ती फार चांगली नव्हती –
खेळपट्टीबाबत बोलताना धवन म्हणाला, “खेळपट्टी चांगली दिसत होती पण ती फार चांगली नव्हती. त्यामुळे चेंडू थोडा थांबून येत होता आणि उसळी सुद्धा घेत होता. त्याचबरोबर वळतही होता.” यानंतर फलंदाजीबाबत धवन म्हणाला, “मी माझ्या धावांवर खूश आहे, पण मला वाटते की पहिल्या सहा षटकांमध्ये मी थोडे अधिक वेगवान खेळू शकलो असतो. एवढीच गोष्ट मला जाणवली. आम्हीही विकेट गमावल्या, आम्ही सलग दोन विकेट गमावल्या आणि त्यामुळे आमच्यावर दबाव निर्माण झाला.”
पंजाब किंग्जचे पुढील ५ सामने –
आयपीएल २०२४ च्या सुरुवातीला पंजाब किंग्ज संघ सध्या २ सामने खेळल्यानंतर १ विजय आणि १ पराभवासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाचे पुढील तीन सामने घरापासून दूर आहेत.
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स – ३० मार्च (लखनऊ)
पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स – ४ एप्रिल (अहमदाबाद)
पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – ९ एप्रिल (हैदराबाद)