Virat Kohli Emotional Celebration: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने करून दाखवलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे चाहते गेल्या १७ वर्षांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. ते स्वप्न अखेर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना पूर्ण झालं आहे. विराट कोहली गेल्या १८ वर्षांपासून या संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकून देण्याच्या प्रयत्नात होता. अखेर अंतिम फेरीत पंजाब किंग्ज संघाला पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याआधी ३ प्रयत्नात या संघाला शेवटी पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आधीपासूनच दमदार फॉर्ममध्ये होता. या संघाने घराबाहेर खेळताना एकही सामना गमावला होता. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून या संघाने क्वालिफायर १ आणि फायनलमध्येही बाजी मारली. या विजयानंतर विराट भावूक झाला. तसेच हा सामना पाहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस देखील अहमदाबादमध्ये उपस्थित होते. सामना जिंकल्यानंतर विराटने डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलला मिठी मारली.
ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे माजी खेळाडू आहेत. या दोघांनी विराट कोहलीसोबत मिळून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र इतके वर्ष या संघाला नशिबाची साथ मिळत नव्हती. यावेळी खेळाडूंनीही दमदार कामगिरी केली आणि नशिबानेही साथ दिली. अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १७ वर्षांची प्रतिक्षा संपवली.
आरसीबीचा दमदार विजय
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २० षटकांअखेर ९ गडी बाद १९० धावा करता आल्या. या सामन्यात फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. पंजाब किंग्ज संघाला या सामना जिंकण्यासाठी १९१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला ७ गडी बाद १८४ धावा करता आल्या. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर केला.