ICC Test Ranking Updates: आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये गोलंदाजीत मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने क्रमवारीतील खराब फॉर्ममुळे आपला क्रमांक एकचा मुकुट गमावला आहे. इंग्लंडचा ४० वर्षीय जेम्स अँडरसन आपल्या शानदार कामगिरीमुळे २०१८ नंतर पहिल्या क्रमांकावर परतला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज अँडरसनचे ८६६ रेटिंग गुण आहेत. अँडरसनने कारकिर्दीत सहाव्यांदा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

जेम्स अँडरसनने इतिहास रचला इतिहास –

इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन ४० वर्षांचा झाला असला तरी त्याच्या गोलंदाजीतील धार कायम आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसनने सात विकेट घेतल्या, ज्यामुळे त्याला उत्कृष्ट गुण मिळाले आणि तो या स्थानावर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेटने १९३६ मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी ही कामगिरी केली होती. जेम्स अँडरसनने आता ८७ वर्षांनंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

अश्विनला नंबर वन होण्याची संधी –

अश्विनचे ​​सध्या ८६४ रेटिंग गुण आहेत. दुसऱ्या कसोटीत रविचंद्रन अश्विनने चमकदार कामगिरी केली, त्याचा फायदा त्यालाही झाला आहे. अश्विन आता कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून तो आता अँडरसनपेक्षा केवळ दोन गुणांनी मागे आहे. तिसऱ्या कसोटीतही त्याने चमकदार कामगिरी सुरू ठेवल्यास तो पुन्हा एकदा हे पहिला क्रमांक पटकावू शकतो. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. त्याचे ८५८ रेटिंग गुण आहेत. तो १४६६ दिवस शीर्षस्थानी राहिला. भारताविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी खराब राहिली होती.

हेही वाचा – Cricket Clinic MSD: ‘धोनी की पाठशाला’मध्ये माही बनला ‘गुरु’; अंडर-19 महिला क्रिकेट संघाला दिल्या महत्वाच्या टिप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित आणि ऋषभला प्रत्येकी एका स्थानाचा फायदा –

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहित शर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे आता ७७७ रेटिंग गुण आहेत. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतलाही स्थान मिळाले आहे. तो ७६९ रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन ९१२ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. लाबुशेनचा देशबांधव स्टीव्ह स्मिथ (८७५ रेटिंग) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे ८६२ रेटिंग गुण आहेत.