India vs England 1st Test: भारत आणि इंग्लड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ आघाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुले अर्धा तासाआधीच थांबवण्यात आला. भारतीय संघाने आतापर्यंत ९६ धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले. दरम्यान सामन्यानंतर बोलताना त्याने झेल सोडण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

जसप्रीत बुमराह पहिल्या डावात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बुमराहने इंग्लंडच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यादरम्यान जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विकेट्स घेण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या होत्या. मात्र,क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुकांमुळे इंग्लंडच्या फलंदाजांना जीवदान मिळालं. भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि रविंद्र जडेजा यांनी काही महत्वाचे झेल सोडले. झेल सोडल्यानंतर बुमराहने संतप्त प्रतिक्रिया दिली. पण त्यानंतर लगेच तो पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला.

काय म्हणाला जसप्रीत बुमराह?

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सुटलेले झेल हे भारतीय संघाला चांगलेच महागात पडले. कारण ते झेल सुटले नसते, तर नक्कीच १०० ते १५० धावांचा फरक पडला असता. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बुमराह म्हणाला,” झेल सुटला, याचा मी फार विचार करत बसत नाही. कोणीच मुद्दाम झेल सोडत नाही. हा खेळाचा एक भाग आहे. युवा खेळाडू आहेत अनुभवाने शिकतील.” भारतीय संघात बरेच खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळत आहेत. इंग्लंडमध्ये स्लिपमध्ये झेल पकडणं मुळीच सोपं नसतं. त्यामुळे कधी कधी झेल सुटतात. मात्र, बुमराहने कोणावरही टीका न करता युवा खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संपूर्ण डाव ४६५ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून ओली पोपने सर्वाधिक १०६ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रुकचं शतक एका धावेने हुकलं. तो ९९ धावांवर माघारी परतला. बेन डकेटने या डावात ६२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर इंग्लंडने ४६५ धावांपर्यंत मजल मारली. पण भारतीय संघापेक्षा ६ धावांनी मागे राहिला. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेला यशस्वी जैस्वास स्वस्तात माघारी परतला. केएल राहुल ४७ धावांवर नाबाद आहे. तर साई सुदर्शनने ३० धावांची खेळी केली आणि शुबमन गिल ६ धावांवर नाबाद आहे.