लंडन : तारांकित फलंदाज जो रूटने (नाबाद ११५ धावा) दुसऱ्या डावात साकारलेल्या दिमाखदार शतकामुळे इंग्लंडने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात केली. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

न्यूझीलंडने दिलेल्या २७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला चौथ्या दिवशी ६१ धावांची आवश्यकता होती. रूटच्या अप्रतिम फलंदाजीमुळे त्यांनी या धावा पहिल्याच सत्रात एकही बळी न गमावता पूर्ण केल्या. रूटने कसोटी कारकीर्दीतील २६वे शतक झळकावताना १७० चेंडूंत १२ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ११५ धावांची खेळी केली. त्याला यष्टीरक्षक-फलंदाज बेन फोक्सची (नाबाद ३२) तोलामोलाची साथ लाभली. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी १२० धावांची अभेद्य भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, लॉर्डसवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव १३२ धावांत आटोपला होता. त्यानंतर इंग्लंडचा संघही १४१ धावांतच गारद झाला. मात्र, त्यांना पहिल्या डावात नऊ धावांची आघाडी मिळाली. मग डॅरेल मिचेल (१०८) आणि टॉम ब्लंडेल (९६) यांच्या योगदानांमुळे न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २८५ धावांची मजल मारली होती. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यांनी हे लक्ष्य ७८.५ षटकांत गाठले.

या मालिकेतील दुसरा सामना १० जूनपासून (शुक्रवार) नॉटिंगहॅम येथे खेळवण्यात येईल. 

संक्षिप्त धावफलक

*न्यूझीलंड (पहिला डाव) : १३२ 

*इंग्लंड (पहिला डाव) : १४१

* न्यूझीलंड (दुसरा डाव) : २८५

* इंग्लंड (दुसरा डाव) : ७८.५ षटकांत ५ बाद २७९ (जो रूट नाबाद ११५, बेन स्टोक्स ५४, बेन फोक्स नाबाद ३२; कायले जेमिसन ४/७९) रूटने शतक झळकावतानाच कसोटी कारकीर्दीत १० हजार धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो अ‍ॅलिस्टर कूकनंतर इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला.