KL Rahul: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील सुरूवातीच्या ३ पैकी २ सामने जिंकून इंग्लंडने २-१ ने मालिकेत आघाडी घेतली आहे. तर भारतीय संघाला केवळ १ कसोटी सामना जिंकता आला आहे.मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुलकडे मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.

मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये केएल राहुलने भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली आहे. डावाची सुरूवात करताना कधी शतक, तर कधी अर्धशतक झळकावून त्याने भारताला भक्कम पाया उभारून दिला आहे. आता इंग्लंडमध्ये मोठा कारनामा करण्यापासून तो अवघ्या ११ धावा दूर आहे. त्याला इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना १००० धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या ११ धावांची गरज आहे. चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ११ धावा करतात तो इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना १००० धावांचा पल्ला गाठणारा चौथा भारतीय फलंदाज बनू शकतो. याआधी केवळ ३ दिग्गज खेळाडूंना हा कारनामा करता आला आहे. ज्यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांसारख्या दिग्गजांचं नाव आहे. सचिनने इंग्लंडमध्ये १५७५, राहुल द्रविडने १३७६ आणि सुनील गावसकर यांच्या नावे इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना ११५२ धावा करण्याची नोंद आहे. तर केएल राहुलने इंग्लंडमध्ये झालेल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये ४१.२० च्या सरासरीने ९८९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतकं झळकावली आहेत.

इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

सचिन तेंडुलकर- १५७५
राहुल द्रविड- १३७६
सुनील गावसकर – ११५२
केएल राहुल- ९८९

केएल राहुल या मालिकेत फलंदाजी करताना चमकला आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यांमध्ये त्याने ६२.५० च्या सरासरीने ३७५ धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर दमदार शतक झळकावलं होतं. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडने दिलेल्या आव्हानाची बरोबरी साधली होती.दुसऱ्या डावातही त्याने चांगली सुरूवात केली होती. पण तो स्वस्तात बाद झाला. राहुल बाद झाला नसता, तर भारतीय संघाने सोपा विजय मिळवला असता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेतील ३ सामने झाले आहेत. आतापर्यंत इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. भारतीय संघाला जर मालिका जिंकायची असेल, तर पुढील दोन्ही सामने काहीही करून जिंकावे लागतील. मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यातही राहुलकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान तो कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.