इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांना अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नव्हता. ट्वेन्टी२० सामन्यात आमच्या गोलंदाजांना प्रभाव दाखविण्याची चांगली संधी आहे व तेथेच त्यांची खरी कसोटी ठरणार आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.
एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-१ असा विजय मिळाला. शेवटच्या सामन्यात त्यांना केवळ पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला, ‘ट्वेन्टी-२० व एकदिवसीय सामने हे कसोटी सामन्यांचाच उपभाग आहे. मात्र या सामन्यांमध्ये आमच्या संघातील काही खेळाडूंना फलंदाजीच्या तंत्रात थोडीशी सुधारणा करावी लागणार आहे. आम्हाला इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स स्पर्धेत खेळायचे आहे. तेथील वातावरण, खेळपट्टय़ांचे रागरंग आदी गोष्टी लक्षात घेता आम्हाला आमच्या शैलीत काही बदल करावे लागतील.
केदारला कौतुकाची थाप
कोहलीने केदार जाधव याच्या कामगिरीविषयी कौतुक करीत सांगितले, ‘केदारने या मालिकेत फलंदाजीत अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आक्रमक फटकेबाजीबरोबरच एकेरी व दुहेरी धावा काढण्याचे त्याचे तंत्रही उल्लेखनीय आहे.’