पीटीआय, मुंबई : मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा ताजातवाना होण्यासाठी विराट कोहलीने अल्पकालीन विश्रांती घ्यावी, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने दिला आहे. गेल्या अडीच वर्षांत कोहलीला आंतरराष्ट्रीय शतक साकारता आलेले नाही. यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामातील १६ सामन्यांत त्याला २२.७३च्या सरासरीने ३४१ धावाच काढता आल्या.

‘‘कोहलीच्या फलंदाजीबाबत चिंता करण्याची नक्कीच आवश्यकता आहे. कारण त्याने याहून अधिक धावा ‘आयपीएल’मध्ये करायला हव्या होत्या. कोहलीने २०१६च्या ‘आयपीएल’ हंगामात सर्वाधिक ९७३ काढल्या, त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने उपविजेतेपद पटकावले होते,’’ असे ली यावेळी म्हणाला. ‘‘कोहलीने क्रिकेटमधून थोडी विश्रांती घेत पुन्हा उजळणी करण्याची आवश्यकता आहे. यातून पुढील कारकीर्दीसाठी त्याला खूप फायदा होईल,’’ असे ली याने सांगितले.

कोहलीकडून यंदा अनेक चुका -सेहवाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी दिल्ली : कोहलीने यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात जेवढय़ा चुका केल्या, तेवढय़ा आपल्या १४ वर्षांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत केल्या नाहीत, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले.  ‘‘यंदाच्या हंगामातील विराट कोहली आपल्याला ज्ञात असलेला मुळीच नव्हता, तर वेगळाच होता. या हंगामात त्याने अनेक चुका केल्या. इतक्या चुका त्याने आपल्या संपूर्ण कारकीर्दीतही केल्या नव्हत्या,’’ असे सेहवागने म्हटले आहे.