Kuldeep Yadav Reveals Who Seat on Rohit Sharma Seat: बहुप्रतिक्षित भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका येत्या २० जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी आयपीएलनंतर भारतीय संघ लंडनमध्ये पोहोचला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवा भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. संघाला या मालिकेत रोहित-विराटची उणीव नक्कीच जाणवणार आहे. दरम्यान कुलदीप यादवने रोहित शर्माच्या टीम बसमधील जागा कोणी घेतली आहे, याचा खुलासा केला आहे.

रोहित शर्माने भारत वि. इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्माने कसोटी कॅपचा फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअऱ केली आणि कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे.

रोहित शर्माच्या निवृत्तीमुळे भारतीय संघाच्या टीम बसमधील त्याची जागादेखील रिकामी आहे. रोहित शर्मा टीम बसमध्ये पहिल्याच सीटवर म्हणजेच ड्रायव्हरच्या मागे रवींद्र जडेजाबरोबर बसत असे. भारतीय संघ इंग्लंडला रवाना होत असताना जडेजा पहिल्या सीटवर एकटाच शांत बसला असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. पण आता रोहितच्या जागी कुलदीप यादव बसतो.

टीम बसमध्ये कुलदीप यादव आता रोहित शर्माच्या जागी जडेजाबरोबर बसतो. कुलदीपने या जागेवर बसण्यामागचे कारणही सांगितले आहे. कुलदीपने रवींद्र जडेजाशी फिरकी गोलंदाजी आणि एकूणच क्रिकेटबद्दल चर्चा करण्यासाठी जडेजाच्या बाजूला बसतो.

पत्रकार परिषदेत टीम बसमधील रोहित शर्माच्या जागेबद्दल बोलताना कुलदीप यादव म्हणाला, “मी तिथे बसतो. मी रोहित शर्माची जागा कधीच घेऊ शकत नाही. मी फक्त जड्डूबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतोय. एक फिरकीपटू म्हणून माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे, कारण अश्विन इथे नाहीये. मी त्याच्याकडून खूप काही शिकलोय. मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरूवात केली, तेव्हा मी या दोघांबरोबर खेळलो आहे. मी लकी आहे की जडेजा माझा स्पिन पार्टनर आहे.”

कुलदीपने २०१८ मध्ये इंग्लंडमध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे, जिथे त्याला त्याच्या नऊ षटकांमध्ये एकही विकेट मिळाली नाही. सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून संघाची पहिली पसंती नसतो. कारण त्याने या देशांमध्ये फक्त दोन सामने खेळले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Rohit Sharma Ravindra Jadeja Team Bus
रोहित शर्मा- रवींद्र जडेजा टीम बस

आता रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीमुळे, कुलदीपला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते यावर सर्वांच्या नजरा आहेत. लॉर्ड्स आणि ओव्हलच्या फिरकी गोलंदाजी ट्रॅकवर तो उपयुक्त ठरू शकते. संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यांच्यापैकी एकाला प्लेईंग इलेव्हनमध्ये निवडणं ही टीम मॅनेजमेंटची कसोटी असणार आहे.