विश्वचषकाच्या सराव परीक्षेत भारतीय संघ पूर्णपणे नापास झाल्याचे दिसून आले. तिरंगी एकदिवसीय स्पर्धेत विनाविजयासह भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताच्या मधल्या फेरीची हाराकिरी पुन्हा एकदा संघाला भोवली आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २०० धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचीही बिकट अवस्था होती. पण जेम्स टेलर आणि जोस बटलर यांनी अर्धशतके झळकावत संघाला तीन विकेट्स राखून विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताला आतापर्यंत सलामीची समस्या भेडसावत होती, पण अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन (३८) यांनी ८३ धावांची सलामी दिली. पण या चांगल्या सलामीनंतरही मधल्या फळीच्या कुचकामी कामगिरीमुळे भारताला २०० धावा करता आल्या. अजिंक्य रहाणेने संघाला चांगली सुरुवात करून देत ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.
इंग्लंडसाठी २०१ धावांचे आव्हान कठीण नव्हते. पण सुरुवातीलाच त्यांना फॉर्मात असलेल्या इयान बेलच्या (१०) रूपात धक्का बसला. त्यानंतर त्यांचे फलंदाज ठरावीक फरकाने तंबूत परतायला लागले आणि त्यांची ५ बाद ६६ अशी बिकट अवस्था झाली. यामध्ये तीन बळी घेत स्टुअर्ट बिन्नीने महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघासाठी विजय मिळवण्याची ही नामी संधी होती. पण टेलर आणि बटलर यांनी सहाव्या विकेटसाठी १२५ धावांची मोलाची भागीदारी रचत संघाचा विजय सुकर केला. सामनावीर टेलरने चार चौकारांच्या जोरावर ८२ धावा फटकावल्या, तर बटलरने सात चौकारांच्या जोरावर ६७ धावांची खेळी साकारत टेलरला सुयोग्य साथ
दिली.
धावफलक
भारत : अजिंक्य रहाणे झे. बटलर गो. फिन ७३, शिखर धवन झे. बटलर गो. वोक्स ३८, विराट कोहली झे. रूट गो. अली ८, सुरेश रैना झे. वोक्स गो. अली १, अंबाती रायुडू झे. बटलर गो. ब्रॉड १२, महेंद्रसिंग धोनी पायचीत गो. अँडरसन १७, स्टुअर्ट बिन्नी झे. बेल गो. फिन ७, अक्षर पटेल झे. बेल गो. फिन १, मोहित शर्मा नाबाद ७, मोहम्मद शमी झे. बटलर गो. वोक्स २५, अवांतर ( लेग बाइज २, वाइड ४) ६, एकूण ४८.१ षटकांत सर्व बाद २००.
बाद क्रम : १-८३, २-१०३, ३-१०७, ४-१३४, ५-१३६, ६-१५२, ७- १६४, ८-१६४, ९-१६५, १०- २००.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन ९-१-२४-१, ख्रिस वोक्स ९.१-१-४७-२, स्टुअर्ट ब्रॉड १०-१-५६-२, स्टिव्हन फिन १०-०-३६-३, मोइन अली १०-०-३५-२.
इंग्लंड : इयान बेल पायचीत गो. शर्मा १०, मोइन अली झे. रायुडू गो. पटेल १७, जेम्स टेलर झे. बिन्नी गो. शर्मा ८२, जो रूट झे. व गो. बिन्नी ३, इऑन मॉर्गन झे. धवन गो. बिन्नी २, रवी बोपारा झे. जडेजा गो. बिन्नी ४, जोस बटलर झे. रायुडू गो शमी ६७, ख्रिस वोक्स नाबाद ४, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद ३, अवांतर (वाइड ७, नो बॉल २) ९, एकूण ४६.५ षटकांत ७ बाद २०१.
बाद क्रम : १-१४, २-४०, ३-४४, ४-५४, ५-६६, ६-१९१, ७-१९३.
गोलंदाजी : स्टुअर्ट बिन्नी ८-०-३३-३, मोहित शर्मा १०-१-३६-२, मोहम्मद शमी ९-०-३१-१, अक्षर पटेल १०-१-३९-१, रवींद्र जडेजा ९.५-०-६२-०.
सामनावीर : जेम्स टेलर.