दिल्ली रणजी संघाचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) ३७वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील मुख्यालयात रविवारी झालेल्या ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली आहे.
रॉजर बिन्नी यांनी गेल्या महिन्यात वयाची सत्तरी पूर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांना ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यांची जागा आता ४५ वर्षीय मन्हास घेतील. माजी अष्टपैलू मन्हास यांनी १५७ प्रथमश्रेणी, १३० देशांतर्गत एकदिवसीय (लिस्ट ए) आणि ५५ ‘आयपीएल’ सामने खेळले. मात्र, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली नाही. ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव फारसे चर्चेतही नव्हते. परंतु ‘बीसीसीआय’च्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची याच महिन्यात नवी दिल्ली येथे बैठक झाली. त्यात मन्हास यांचे नाव पुढे करण्यात आले. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद सांभाळण्याची संधी मन्हास यांना देण्यात आली आहे.
अन्य पदाधिकारी…
‘बीसीसीआय’ उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव देवजीत सैकिया आणि ‘आयपीएल’ अध्यक्ष अरुण धुमल आपापल्या पदी कायम राहिले आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू रघुराम भट कोषाध्यक्ष या नात्याने ‘बीसीसीआय’ची तिजोरी सांभाळतील. याआधी कोषाध्यक्ष म्हणून काम करणारे प्रभतेज भाटिया आता सहसचिवपदाची जबाबदारी स्वीकारतील. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जयदेव शहा यांची कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते माजी कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची जागा घेतील.
निवड समितीत बदल
माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह आणि माजी फिरकीपटू प्रग्यान ओझा यांना वरिष्ठ पुरुष संघाच्या निवड समितीत स्थान मिळाले आहे. अजित आगरकर (अध्यक्ष), शिव सुंदर दास आणि अजय रात्रा हे अन्य तीन सदस्य समितीत कायम आहेत. याआधी वरिष्ठ निवड समितीत असणारे एस. शरथ आता कनिष्ठ निवड समितीत परतले आहेत. तसेच महिला संघाच्या अध्यक्षपदाची धुरा अमिता शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्या नितू डेव्हिड यांची जागा घेतील. माजी वेगवान गोलंदाज अमिता यांनी भारतासाठी ११६ एकदिवसीय सामने खेळले होते. त्यांच्यासह सुलक्षणा नाईक, शमा डे, जया शर्मा आणि श्रवंती नायडू यांचा निवड समितीत समावेश आहे.
क्रिकेट प्रशासनाचा अनुभव
– अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली आणि हरभजन सिंग अशा नामांकित माजी कसोटीपटूंची नावे चर्चेत असताना मन्हास यांची नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
– परंतु ‘बीसीसीआय’च्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची याच महिन्यात नवी दिल्ली येथे बैठक झाली. त्यात मन्हास यांचे नाव पुढे करण्यात आले आणि त्यावर कोणालाही आक्षेप नव्हता. तसेच या निवडीमागे ‘भाजप’ही असल्याचे समजते. मन्हास यांना क्रिकेट प्रशासनाचा अनुभव आहे.
– जम्मू येथे जन्मलेल्या मन्हास यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक वर्षे दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. मात्र, कारकीर्दीच्या अखेरीस ते जम्मू-काश्मीरकडे परतले.
– खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी ‘आयपीएल’मध्ये विविध संघांना मार्गदर्शन केले. मात्र, जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेचा अनागोंदी कारभार रोखण्यासाठी ‘बीसीसीआय’ने २०२१मध्ये एक उपसमिती नियुक्त केली. त्याचे प्रमुख म्हणून मन्हास यांची निवड करण्यात आली.
– मन्हास यांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेत चांगले बदल घडले. या संघाची रणजी स्पर्धेतील कामगिरीही सुधारली. तसेच जम्मू-काश्मीरमधील खेळपट्ट्यांतही मोठा बदल घडून आला. त्यामुळे मन्हास यांच्याबाबत सकारात्मक चित्र तयार झाले.