Mohammed Siraj News: आयपीएल २०२५ स्पर्धेत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने या हंगामात दमदार कामगिरी केली. मात्र, एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर, गुजरातचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ही स्पर्धा संपताच गुजरात टायटन्स संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद सिराजच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

मोहम्मद सिराजने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याने भारतीय संघाचा स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग प्रशिक्षक सोहम देसाईसाठी शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर त्याने सोहम देसाईला गुडबाय करण्यासाठी केली आहे. सोहम देसाईचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे सिराजने त्याच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. प्रशिक्षकांचा बीसीसीआयसोबत काही वर्षांचा करार असतो. ३१ मे रोजी सोहम देसाईचा स्ट्रेंथ अँड कंडीशनिंग प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. गेल्या ३ वर्षांपासून त्याने भारतीय संघाच्या मुख्य ट्रेनरची भूमिका बजावली आहे. तर गेल्या ५ वर्षांपासून तो भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा सदस्य आहे.

सोहम देसाईसाठी मोहम्मद सिराजची भावूक पोस्ट

सिराजने सोहम देसाईसाठी केलेली भावूक पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. एका युझरने लिहिले,” मला वाटलं सिराजने निवृत्ती जाहीर केली आहे.” तर आणखी एका युझरने लिहिलं, “भावा मेन्शन तरी करायचं कोणासाठी पोस्ट करतोय. ” सिराजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की,”अशा व्यक्तीचा निरोप घेणं, खूप कठीण असतं. जो केवळ प्रशिक्षक नसून मार्गदर्शक, मेंटॉर आणि भाऊसारखा आहे. सोहम देसाईचा प्रभाव ड्रेसिंग रूम आणि जिममध्येही जाणवेल. हा शेवट नाही, लवकरच पुन्हा भेटू.”

सोहम देसाई आहे तरी कोण?

सोहम देसाईने गेल्या ३ वर्षांपासून भारतीय संघाच्या मुख्य ट्रेनरची भूमिका पार पडली. तसेच ५ वर्षांपासून तो भारतीय संघाचा भाग आहे. खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करणं हे त्याचं प्रमुख काम होतं. जिममध्ये खेळाडूंचा सराव करून घेणं, यासह त्यांना जिमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये मदत करणं हे देखील त्याचं प्रमुख काम होतं.

सोहमने वयाच्या २९ व्या वर्षी भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये प्रवेश केला होता. भारतीय संघासोबत काम करण्यापूर्वी त्याने गुजरातच्या रणजी संघासोबत फिटनेस ट्रेनर म्हणून काम केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.