Viral Cricket Video: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामनात रायगड रॉयल्स आणि पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात विकी ओस्तवालने दमदार ७४ धावांची खेळी केली. या खेळीच्या रायगड रॉयल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण दोन्ही फलंदाजांमध्ये धाव घेत असताना जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही फलंदाज मैदानावर पडले. आता दोन्ही फलंदाज मैदानावर पडल्यानंतर गोलंदाजी करत असलेल्या संघाने खेळभावना दाखवणं गरजेचं होतं. मात्र, क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाने दोन्ही फलंदाजांना धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनाही धावबाद करण्यात यश आलं नाही. त्यामुळे क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
तर झाले असे की, रायगड रॉयल्स आणि पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्यात झालेल्या सामन्यात रायगड रॉयल्स संघातील फलंदाजाने शॉट मारताच धाव घेण्याचा प्रयत्न केला. धावत असताना दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं नाही. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार धडक झाली. धडक होताच फलंदाज मैदानावर आपटल्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आधी कोल्हापूर संघातील क्षेत्ररक्षकांनी नॉन स्ट्राईकला थ्रो मारला,पण हा थ्रो हुकला. त्यानंतर स्ट्राईकच्या दिशेने थ्रो मारला. दोन्ही फलंदाज बाद होण्यापासून थोडक्यात बचावले. राहुल त्रिपाठीच्या थ्रो मुळे फलंदाजी करत असलेल्या संघाला ओव्हर थ्रो मुळे ४ अतिरिक्त धावा मिळाल्या.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना कोल्हापूरने २० षटकांअखेर ७ गडी बाद १६४ धावा केल्या. कोल्हापूरकडून फलंदाजी करताना अंकित बावेने ५० चेंडूंचा सामना करत ५७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि २ चौकार मारले.
रायगड संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना विक्की ओस्तवालने ७४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि १ षटकार मारला. यासह कोल्हापूरने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.