भारतीय संघाचा तरुण लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने महेंद्रसिंह धोनीबाबत एक आठवण सांगितली आहे. युजवेंद्र चहलने 2016 मध्ये झिम्बाब्वेविरोधात टीम इंडियात पदार्पण केलं. चहलने पदार्पण केलं त्यावेळी धोनी संघाचा कर्णधार होता. युट्यूबवरील ब्रेकफास्ट विद चॅम्पियन या कार्यक्रमात चहलने धोनीबाबत एक आठवण सांगितली आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघात पदार्पण करताना मला धोनीकडून कॅप घ्यावी लागली. त्या दिग्गज खेळाडूसोबत मी पहिल्यांदाच होतो. त्याच्यासमोर काय बोलावं हे देखील मला सुचत नव्हतं. पण तो इतका मनमोकळा बोलतो, की खरंच हा दिग्गज खेळाडू धोनीच आहे का असा प्रश्न पडतो. या दौऱ्यावर धोनीची पहिल्यांदा भेट झाली त्यावेळी मी ‘माही सर’ असं त्याला म्हणालो. थोड्यावेळाने धोनीने मला बोलावलं आणि ‘मला माही, धोनी, महेंद्रसिंह धोनी किंवा भाई असं काहीही म्हण पण मला सर बोलू नकोस’ असं तो मला म्हणाला. कोणी सर म्हणालेलं धोनीला आवडत नाही असं चहल म्हणाला. धोनी स्वतः खूप मनमिळावू आणि खेळकर स्वभावाचा आहे असंही चहलने सांगितलं.

या शोमध्ये चहलने ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू अॅन्ड्र्यू सायमंड्स याच्याबाबतीतही काही आठवणींना उजाळा दिला आहे. सायमंड्स आणि त्याच्याच चांगली मैत्री कशी झाली याबाबत चहलने सांगितलं आहे. ऑस्ट्रेलियात गेल्यावर सायमंड्ससोबत मासेमारी करायला नेहमी जातो असंही चहलने सांगितलं.