MS Dhoni Retirement Marathi News : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचं नाव आदराने घेतलं जातं. धोनीने निवृत्ती घेऊन चार वर्षे झाली तरी त्याची लोकांवरची मोहिनी तसूभरही कमी झालेली नाही. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. त्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी आयपीएलच्या सुरुवातीला त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. धोनीच्या या घोषणेने त्याचे चाहते निराश झाले होते. परंतु, धोनीने घोषणा करण्याच्या एक वर्ष आधीच निवृत्ती घेतली होती. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडमध्ये उपांत्य फेरीतला सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारत पराभूत झाला होता.
विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर धोनी वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने समाजमाध्यमांवर एक पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली. धोनी ९ जुलै २०१९ रोजी त्याचा अखेरचा सामना खेळला होता. परंतु, त्यानंतर १३ महिन्यांनी त्याने निवृत्तीची घोषणा केली. धोनीने आधीच मनोमन निवृत्ती घेतली होती. केवळ घोषणा केली नव्हती. दरम्यान, धोनीने त्याच्या निवृत्तीबाबत पहिल्यांदाच माध्यमांसमोर भाष्य केलं आहे.
महेंद्रसिंह धोनी म्हणाला, त्याच दिवशी (मँचेस्टरमध्ये खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावेळी) मला समजलं होतं की हा माझा अखेरचा सामना आहे. मी खूप भावनिक झालो होतो. कारण, इथून पुढे मी देशाचं प्रतिनिधित्व करू शकणार नाही, याची मला जाणीव होती. प्रत्येक खेळाडूसाठी ही खूप मोठी भावनिक गोष्ट असते. खेळाडू कुठल्याही खेळातला असो, त्याच्यासाठी हा एक अवघड क्षण असतो.
हे ही वाचा >> Cricket World Cup 2023: पाकिस्तानला विजय आवश्यक! लयीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेशी आज सामना; कर्णधार बाबरवर लक्ष
निवृत्तीची घोषणा करण्याआधीच्या वर्षभरातील प्रवासाबद्दल धोनी म्हणाला, संघव्यवस्थापनाने आपल्याला काही वस्तू, मशीन्स दिलेल्या असतात. मी त्या वस्तू अनेकदा प्रशिक्षक आणि संघव्यवस्थापनाला देण्यासाठी जायचो. त्यांना देण्याचा प्रयत्न करायचो. तेव्हा ते मला सांगायचे, हे आम्हाला देऊ नकोस, तुझ्याकडेच ठेव. तेव्हा मला प्रश्न पडायचा, यांना कसं सांगू की, याची आता मला गरज नाही. मी हे वापरत नाही. कारण मला तेव्हा निवृत्तीची घोषणा करायची नव्हती.