MI Capetown vs Sunrisers Eastern Cape SAT20: दक्षिण आफ्रिकेत झालेल्या SA टी२० स्पर्धेत मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या संघाने जेतेपदावर नाव कोरलं. एमआय केपटाऊन संघाने जोहान्सबर्ग इथे झालेल्या अंतिम लढतीत सनरायझर्स इस्टर्न केप संघाची जेतेपदाची हॅट्ट्ट्रिक रोखली. योगायोग म्हणजे अंतिम लढतीतला मुंबईचा प्रतिस्पर्धी संघ सनरायझर्स या संघाची मालकी आयपीएलमधल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडेच आहे.

मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल स्पर्धेचं जेतेपद पाचवेळा पटकावलं आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेचं जेतेपद दोनदा पटकावलं आहे. वूमन्स प्रीमिअर लीगचं जेतेपदही त्यांनी मिळवलं आहे. मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत ते अजिंक्य होते. आयएल टी२० स्पर्धेत गेल्यावर्षी त्यांनीच जेतेपदावर नाव कोरलं. विजयी परंपरा कायम राखत त्यांनी दक्षिण आफ्रिका२० स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला.

एमआय केपटाऊन संघाने प्रथम फलंदाजी करताना १८१ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना सनरायझर्स केपचा डाव १०५ धावांतच आटोपला. ट्रेंट बोल्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०४ धावा आणि १९ विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मार्को यान्सनला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमआय केपटाऊन संघातर्फे कॉनर इस्टरह्यूझनने ३९ तर डेवाल्ड ब्रेव्हिसने ३८ धावांची खेळी केली. सलामीवीर रायल रिकलटनने ३३ धावा केल्या. सनरायझर्स संघातर्फे मार्को यान्सन, रिचर्ड ग्लिसन, लायन डॉसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. रशीद खान, ट्रेंट बोल्ट, कागिसो रबाडा असं भेदक आक्रमण असलेल्या मुंबईने सनरायझर्स संघाला १०५ धावांतच गुंडाळलं. रबाडाने ४ तर बोल्टने २ विकेट्स पटकावल्या. टॉम अबेलने ३० धावा केल्या.