वृत्तसंस्था, मुंबई

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या नव्या हंगामाची विजयी सुरुवात करणाऱ्या मुंबई आणि विदर्भ या संघांनी कामगिरीत सातत्य राखण्याचे ध्येय बाळगले आहे. आज, शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या साखळी सामन्यात मुंबईची छत्तीसगड, तर गतविजेत्या विदर्भाची झारखंडशी गाठ पडणार आहे. मुंबई आणि विदर्भ या दोनही संघांना हे सामने घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे.

मुंबईने अतिशय रंगतदार झालेल्या सलामीच्या लढतीत जम्मू-काश्मीर संघावर मात केली होती. श्रीनगर येथे झालेल्या या सामन्यात सिद्धेश लाड वगळता मुंबईच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली होती. मात्र, शम्स मुलानीच्या अष्टपैलू खेळाने मुंबईला तारले. त्यामुळे शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वाखाली पहिल्याच सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला. मुंबईच्या संघात सर्फराज खान आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांसारखे नामांकित फलंदाज आहेत. त्यांचा कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न असेल. वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’ शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर हा सामना होणार असून येथील खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. अशात मुलानीची कामगिरी मुंबईसाठी पुन्हा निर्णायक ठरू शकेल. छत्तीसगडची भिस्त विदर्भाचा माजी फिरकीपटू आदित्य सरवटे याच्यावर असेल.

दुसरीकडे, विदर्भाला झारखंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. विदर्भाने सलामीच्या लढतीत तुलनेने दुबळ्या नागालँडला डावाने पराभूत केले होते. त्याच वेळी झारखंडने तुलनेने बलाढ्य तमिळनाडूला पराभवाचा धक्का दिला होता. विशेष म्हणजे झारखंडनेही सामना डावाने जिंकला होता. त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास दुणावलेला आहे. झारखंडसाठी इशान किशनने शतक साकारले होते. आता हीच लय कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. विदर्भासाठी अमन मोखाडे आणि यश राठोड यांनी फलंदाजीत निर्णायक योगदान दिले होते. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडूनच विदर्भाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

महाराष्ट्रासमोर चंडीगडचे आव्हान

महाराष्ट्राच्या संघाने रणजी हंगामाची चांगली सुरुवात केली. गतउपविजेत्या केरळविरुद्ध महाराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवले होते. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला असला, तरी महाराष्ट्राला तीन गुणांची कमाई करता आली. आता हीच लय कायम ठेवत आजपासून सुरू होणाऱ्या चंडीगडविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राचा हंगामातील पहिला विजय नोंदविण्याचा प्रयत्न असेल. महाराष्ट्राची मदार ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ आणि जलज सक्सेना यांच्यावर असेल. तसेच डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवाल याचीही कामगिरी महत्त्वाची ठरेल.

रवींद्र जडेजाचाही सौराष्ट्रकडून सहभाग

भारताचा आघाडीचा अष्टपैलू रवींद्र जडेजाची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली नाही. त्यामुळे तो रणजी सामना खेळणे अपेक्षित आहे. आजपासून सुरू होणाऱ्या मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीत तो सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करेल. जडेजा गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तसेच रणजी स्पर्धेतही त्याने यापूर्वी दर्जेदार खेळ केला आहे. त्यामुळे या लढतीतही त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जाईल. राजकोट येथील खेळपट्टी कायमच फिरकीला अनुकूल ठरते. याचा पुरेपूर फायदा घेण्याचा जडेजाचा मानस असेल.