Naveen-ul-Haq vs Virat Kohli: नवीन-उल-हकचा विराट कोहलीसोबत झालेला वाद हा आयपीएल २०२३ च्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक होता. लखनऊ सुपर जायंट्सचा भाग असलेला हा अफगाणिस्तानचा स्टार नवीन-उल-हक आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून खेळत असलेला विराट कोहली यांच्यात सामन्यादरम्यान अनेक गोष्टी जवळजवळ नियंत्रणाबाहेर गेल्या. दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. नंतर एलएसजीचे प्रशिक्षक गौतम गंभीरही यात सहभागी झाला होता. या घटनेनंतर दोन्ही क्रिकेटपटूंच्या सोशल मीडिया पोस्ट नेटिझन्ससाठी उत्सुकतेचा विषय बनल्या आहेत. जवळजवळ, प्रत्येक वेळी त्यांनी काहीतरी पोस्ट केल्यावर, चाहत्यांना त्यांच्या या वादाशी एक संबंध आढळून आला आहे.
नवीनने शनिवारी सिंह, वाघ आणि गाढवाची कथा पोस्ट केली आहे. तो विडियो संपताना एक संदेश दिला आहे. व्हिडिओच्या शेवटी असणाऱ्या संदेशात म्हटले आहे, “ मूर्ख आणि दुराग्रही लोकांशी वाद घालणे म्हणजे वेळेचा वाईटरित्या केलेला अपव्यय! हे असे लोक असतात ज्याना सत्य किंवा वास्तवाची अजिबात पर्वा नाही, जिथे केवळ त्याच्या आत्मघातकी अतिविश्वास आणि भ्रमांचा विजय होत असतो. असे लोक आहेत जे आम्ही त्यांच्यासमोर कितीही पुरावे सादर केले तरी त्यांच्यात समजून घेण्याची क्षमता नसते. ते फक्त अहंकार, द्वेष आणि संतापाने आंधळे झालेले असतात आणि इतराना केवळ त्यांच्या बरोबर राहायचे असते मग ते चूक असू दे अथवा बरोबर!”
नवीनने अलीकडेच या घटनेबद्दल खुलासा केला होता आणि सांगितले की सर्वात पाहिले कोहलीने भांडायला सुरूवात केली होती आणि याचा पुरावा म्हणजे त्या दोन क्रिकेटपटूंना झालेली शिक्षा! नवीन बीबीसी पश्तोला सांगताना म्हणतो, “त्याने या सगळ्या गोष्टी सामन्यादरम्यान आणि नंतर बोलायला नको होत्या. मी वादाला सुरूवात केली नाही. सामन्यानंतर, जेव्हा आम्ही हस्तांदोलन करत होतो, तेव्हा विराट कोहलीने समोरून येऊन भांडणाला तोंड फोडले.”
याबाबतीत बोलताना तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही फी स्वरूपातील भरला गेलेला दंड पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल, वादाला कोणी सुरूवात केली.” कोहलीला त्याची संपूर्ण मॅच फी दंड स्वरूपात भरावी लागली होती, तर नवीनला केवळ अर्धी फी दंड म्हणून ठोठावण्यात आली होती. संवादात, वेगवान गोलंदाजाने असेही सांगितले की तो कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने भडकावल्याशिवाय स्लेजिंग करत नाही.
स्लेजिंग बाबतीत बोलताना तो पुढे म्हणतो, “मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की मी सहसा कोणसोबतही स्लेजिंग करत नाही, आणि जरी मी फलंदाजांसोबत केले तरी मी तेव्हा मैदानात गोलंदाजी करत असतो. त्या सामन्यात मी एक शब्दही उच्चारला नाही. मी कोणालाही स्लेज केले नाही. खेळाडू, जे तिथे होते त्यांना माहित आहे की मी परिस्थिती कशी हाताळली. ”
“मी फलंदाजी करताना किंवा सामन्यानंतर कधीही माझा संयम गमावला नाही. सामन्यानंतर मी काय केले ते प्रत्येकजण पाहू शकतो. मी फक्त हात हलवत होतो आणि मग त्याने (कोहली) माझा हात जबरदस्तीने पकडला आणि मी देखील माणूस आहे म्हणून मी त्यावर प्रतिक्रिया दिली, ”या घटनेबद्दल विचारले असता त्याने मुलाखतीत सांगितले.