IND A vs England Lions Highlights: आगामी इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघांमध्ये २० जूनपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने इंग्लंडमध्ये जाऊन सराव करायला देखील सुरूवात केली आहे. दरम्यान मुख्य संघात स्थान मिळालेले काही खेळाडू, भारतीय अ संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. भारतीय अ संघाचा दुसरा अनधिकृत कसोटी सामना इंग्लंड लायन्स संघाविरूद्ध सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत सामन्यात भारतीय अ संघातील फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात ३४८ धावा करता आल्या. यादरम्यान केएल राहुलने शानदार शतकी खेळी केली. तर दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड लायन्स संघाला ४६ षटकांअखेर ३ गडी बाद १९२ धावा करता आल्या. बॅड लाईटमुळे दिवसाचा खेळ लवकर समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शार्दुल ठाकूर – नितीश कुमार रेड्डीची फ्लॉप कामगिरी

शार्दुल ठाकूरला या सामन्यात नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने गोलंदाजी करताना ६ षटकात २२ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला नाही. तर दुसरीकडे नितीश रेड्डीने ६ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २५ धावा केल्या. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळत होता. मात्र, दोघेही स्विंगचा फायदा घेऊ शकले नाही. गोलंदाजीसह फलंदाजी करतानाही दोघे फ्लॉप ठरले. शार्दुलला १९ तर नितीश कुमार रेड्डीला अवघ्या ३४ धावा करता आल्या.

इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी दोघांनाही संघात स्थान देण्यात आलेलं आहे. दोघांपैकी एकाला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, दोघेही आपली छाप सोडण्यात अपयशी ठरले आहेत. अष्टपैलू खेळाडूंसह वेगवान गोलंदाजांचाही फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज खलिल अहमद आणि तुषार देशपांडेलाही गोलंदाजीत आपली छाप सोडता आलेली नाही.

भारतीय संघाकडून केएल राहुल चमकला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात भारतीय अ संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. भारतीय अ संघाकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी मैदानावर आली. या डावात यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्याला अवघ्या १७ धावा करता आल्या. तर केएल राहुलने १६८ चेंडूंचा सामना करत ११६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि १ षटकार लगावला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने ११, करुण नायरने ४०, ध्रुव जुरेल ५२, नितीश रेड्डीने ३४, शार्दुल ठाकूरने १९, तनुष कोटीयानने १५, अंशूल कंबोजने २, तुषार देशपांडेने ११ आणि खलिल अहमदने नाबाद ७ धावांची खेळी केली. भारतीय अ संघाचा संपूर्ण डाव ३४८ धावांवर आटोपला.