India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना येत्या २३ जूनपासून खेळवला जाणार आहे. तिसऱ्या कसोटीत अवघ्या काही धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियासाठी मालिकेच्या दृष्टीने पुढील सामना फार महत्त्वाचा असणार आहे. पण मॅनचेस्टर कसोटीपूर्वी भारतीय संघ दुखापतींनी वेढला गेला आहे. आकाशदीप आणि अर्शदीप सिंग यांच्या दुखापतींनंतर, अजून एक खेळाडूला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे आणि आता भारताचा हा खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर झाल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय संघाचे गोलंदाज आकाशदीप आणि अर्शदीप सिंगनंतर आता टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूला दुखापत झाली आहे. जसप्रीत बुमराह आणि भारताच्या गोलंदाजी आक्रमणाला चांगला पाठिंबा देत महत्त्वाचे बळी घेणारा नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार नितीश कुमार रेड्डी इंग्लंडविरूद्ध उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. २० जुलै म्हणजेच रविवारी नितीश कुमार रेड्डी जायबंदी झाला. रविवारी जीममध्ये सराव करत असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. याच कारणास्तव त्याच्या उपलब्धतेबाबत मोठा प्रश्न होता आणि आता मालिकेबाहेर होणार असल्याचे समजत आहे. बीसीसीआयने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
भारताच्या खेम्यातील दुखापतींचा सर्वाधिक फटका हा गोलंदाजी विभागाला बसला आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी नव्या गोलंदाजाला स्थान देण्यात आलं आहे. एके ४७ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २४ वर्षीय अंशुल कंबोजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला मँचेस्टर कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
ऋषभ पंतला देखील लॉर्ड्स कसोटीत दुखापत झाली होती. ज्यामुळे तो फक्त फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता आणि यष्टीरक्षणाची जबाबदारी ध्रुव जुरेलने सांभाळली होती. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात पंतला फलंदाज म्हणून खेळवले जाण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे नितीश रेड्डीच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ध्रुव जुरेलला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात येईल.