वृत्तसंस्था, पासाडेना
महिन्याच्या सुरुवातीला चॅम्पियन्स लीग जिंकून युरोपातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब म्हणून लौकिक मिळवलेल्या पॅरिस सेंट-जर्मेन संघाला ‘क्लब विश्वचषक’ स्पर्धेतील लढतीत ब्राझिलियन संघ बोटाफोगोकडून पराभवाचा धक्का मिळाला. आघाडीपटू इगोर जेसूसच्या गोलच्या जोरावर बोटाफोगोने लढतीत १-० अशी बाजी मारली.
पॅरिस सेंट-जर्मेनचा संघ ३ मेपासून कोणत्याही स्पर्धेत पराभूत झाला नव्हता. क्लब विश्वचषकातील सलामीच्या लढतीत सेंट-जर्मेन संघाने स्पेनच्या अॅटलेटिको माद्रिदवर ४-० असा मोठा विजय मिळवला होता. मात्र, बोटाफोगोविरुद्ध त्यांना सर्वोत्तम खेळ करता आला नाही. कॅलिफोर्नियातील रोझ बोल मैदानावर ५३ हजार ६९९ प्रेक्षकांसमोर खेळताना बोटाफोगोने या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वांत धक्कादायक निकालाची नोंद केली.
जेसूसने ३६व्या मिनिटाला बोटाफोगोला आघाडी मिळवून दिली. ती टिकवण्यासाठी संघाला संघर्ष करावा लागला. उत्तरार्धात सेंट-जर्मेनने बरोबरीचा प्रयत्न केला. त्यांनी गोलच्या दिशेने १६ फटकेही मारले. मात्र, अखेरीस त्यांचे प्रयत्न फोल ठरले आणि त्यांना पराभवाचाच सामना करावा लागला. प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी शर्यतीत असलेला आक्रमकपटू ओस्मान डेम्बेले सलग दुसऱ्या लढतीत खेळू शकला नाही. त्याची उणीव सेंट-जर्मेनला जाणवली. अन्य लढतींत, अॅटलेटिको माद्रिदने अमेरिकेच्या सिअॅटल साऊंडर्स क्लबचा ३-१ असा, तर ब्राझीलच्या पाल्मिरास संघाने इजिप्तच्या अल अहली संघाचा २-० असा पराभव केला.
मेसीमुळे मियामीचा विजय
तारांकित आक्रमकपटू आणि कर्णधार लिओनेल मेसीच्या निर्णायक गोलमुळे इंटर मियामी संघाने क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात आघाडीचा पोर्तुगीज संघ एफसी पोर्टोवर २-१ असा विजय मिळवला. सामू अघेहोवाने पेनल्टीच्या साहाय्याने गोल करत पोर्टोला आठव्याच मिनिटाला आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी मध्यंतरापर्यंत टिकली. उत्तरार्धात ४७व्या मिनिटाला टेलास्को सेगोवियाच्या गोलमुळे मियामीने १-१ अशी बरोबरी साधली. मग ५४व्या मिनिटाला मियामीला फ्री-किक मिळाली. यावर मेसीने सुरेख फटका मारून गोल केला. अखेरीस तोच निर्णायक ठरला.