प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिच्याशी ऑस्कर पिस्टोरियसचे जोरदार भांडण झाले असल्याचा पुरावा एका माहितगाराने दिला असल्याचे पोलीस अधिकारी हिल्टन बोथा यांनी सांगितले. रिव्हाची हत्या केल्याचा आरोप ऑलिम्पिक ‘ब्लेड रनर’ ऑस्कर याच्यावर ठेवण्यात आला आहे.
बोथा यांनी सांगितले की, ‘‘रिव्हा हिच्यावर बाथरूमच्या दरवाजातून तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक गोळी तिच्या डोक्यात घुसली होती तसेच अन्य गोळ्याही शरीरात घुसल्यामुळे तिच्या शरीरातून खूप रक्तस्राव झाला. जर ऑस्करने दरवाजावर गोळ्या झाडल्या असत्या तर त्या गोळ्या शरीरात एवढय़ा आतपर्यंत घुसल्या नसत्या. ऑस्करच्या घराजवळ राहणाऱ्या एका माहितगाराने ऑस्कर व रिव्हा यांच्यात हत्येपूर्वी खूप मोठमोठय़ाने भांडणे चालली होती. या भांडणातूनच ऑस्करने रिव्हावर गोळ्या झाडल्या.’’
‘‘पिस्टोरियस याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याचाही आरोप ठेवला जाण्याची शक्यता आहे,’’ असेही बोथा यांनी सांगितले.
बाथरूममध्ये लपलेली व्यक्ती रिव्हा नसून कोणीतरी महिला चोर शिरली असे समजून आपण बाथरूमच्या दरवाजातून गोळ्या झाडल्या. रिव्हाची हत्या करण्याचा आपला हेतू नव्हता असे ऑस्कर याने न्यायालयात जबाब देताना सांगितले.