पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू इमाद वासिमच्या ५ विकेट्सच्या शानदार कामगिरीच्या जोरावर इस्लामाबाद युनायटेड संघाच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. पाकिस्तान सुपर लीग २०२४ चा अंतिम सामना १८ मार्च सोमवारी मुलतान सुलतान आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात खेळवला गेला. कराची येथील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ सामना जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, या हायव्होल्टेज सामन्यात इस्लामाबाद युनायटेडने अखेर बाजी मारली. इस्लामाबादने हा सामना २ गडी राखून जिंकला.

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेडकडून खेळत होता. आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तान संघाने ज्या अष्टपैलू खेळाडूला राष्ट्रीय संघातून झिडकारले, त्यानेच आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. भारतात झालेल्या विश्वचषकात पाकिस्तान संघामध्ये इमाद वसीमची निवड करण्यात आली नव्हती. संघात चांगल्या फिरकी आक्रमणाची कमी होती, पण तरीही पाकिस्तानने इमादसारख्या उत्कृष्ट फिरकीपटूला आणि बॅटनेही चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला डावलले होते. यानंतर इमाद वसीमने निवृत्ती जाहीर केली. आता याच इमादने मोहम्मद रिझवानच्या मुलतान सुलतान संघाच्या पराभवाचा मोठा चेहरा ठरला.

इमादने गोलंदाजी करताना एक-दोन नाही तर ५ बळी घेतले. त्याने यासिर खान, डेव्हिड विली, जॉन्सन चार्ल्स, खुशदिल शाह आणि ख्रिस जॉर्डन यांना तंबूत धाडले. इमादने ४ षटकांत केवळ २३ धावा दिल्या. पीएसएल फायनलच्या इतिहासात इमाद वसीम ५ विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. गोलंदाजीनंतर वसीमने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. वसीम शेवटपर्यंत मैदानात पाय रोवून उभा होता आणि त्याने २ चौकारांच्या मदतीने नाबाद १९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याच्या अप्रतिम कामगिरीसाठी इमादला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. फक्त अंतिम सामन्यातच नव्हे तर पीएसएलच्या बऱ्याच सामन्यांमध्ये त्याने सामनावीर पुरस्कार मिळवले आहेत.

इमाद वसीम सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा भाग नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता. मात्र, या पीएसएल हंगामात इमादची कामगिरी उत्कृष्ट होती. इमाद वसीमने आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानकडून ५५ वनडे आणि ६६ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ९८६ धावा आणि ४४ विकेट आहेत, तर टी-२० मध्ये त्याच्या नावावर ४८६ धावा आणि ६५ विकेट आहेत.

अंतिम सामन्यात इस्लामाबाद युनायटेडचा विजय

पीएसएल ही पाकिस्तानातील टॉप ट्वेन्टी२० लीग आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना हा हवामानाच्या कारणामुळे रविवारऐवजी सोमवारी रात्री खेळवला गेला. इमाद वसीमच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इस्लामाबाद युनायटेडने पाकिस्तान सुपर लीगमध्ये तिसरे विजेतेपद पटकावले. रोमहर्षक फायनलमध्ये मुलतानने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावत १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इस्लामाबादने वेगवान सुरुवात केली, पण सतत पडणाऱ्या विकेट्सनंतर इमाद वसीमने पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली आणि १७ चेंडूंत नाबाद १९ धावा करून संघाला तिसरे विजेतेपद मिळवून दिले. मुलतान संघाचा कर्णधार रिझवानची संथ खेळी संघासाठी नकारात्मक बाब ठरली. त्यामुळे मुलतान सुलतान संघासा सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

शानदार कामगिरीनंतर इमाद वसीमचा धुम्रपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल

इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान यांच्यातील या जेतेपदाच्या लढतीत अष्टपैलू इमाद वसीमचं कौतुक होत असतानाच त्याचा एक व्हिडिओ समार आला आहे. या व्हिडिओमध्ये इमाद ड्रेसिंग रूममध्ये धुम्रपान करताना दिसत आहे. जेव्हा त्याचा संघ पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये जाऊन धुम्रपान करत होता. त्याचे हे वागणं कॅमेऱ्यात कैद झालं आणि आता सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.