इंडोनेशिया खुली बॅडिमटन स्पर्धा : सिंधू-श्रीकांतचा सातत्यपूर्ण कामगिरीचा निर्धार

इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत श्रीकांतची वाटचाल डेन्मार्कच्या अँडर्स अँटनसेनने रोखली होती.

बाली : दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीचा निर्धार केला आहे.

सिंधू आणि श्रीकांत यांनी ‘सुपर ७५०’ श्रेणीच्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. शनिवारी या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर या दोघांनीही ‘सुपर १०००’ श्रेणीच्या इंडोनेशिया खुल्या स्पर्धेतील जेतेपदासाठी तयारी सुरू केली.

विश्वविजेत्या सिंधूने स्विस खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने अखेरची अंतिम फेरी गाठली होती. गेल्या दोन स्पर्धासह एकूण तीन स्पर्धाच्या उपांत्य फेरीपर्यंत तिने मजल मारली; परंतु तिची वाटचाल मर्यादित राहिली. मागील आठवडय़ात अकाने यामागुचीने सरळ गेममध्ये तिला पराभूत केले. इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत तिसऱ्या मानांकित सिंधूपुढे सलामीला जपानच्या अया ओहोरीचे आव्हान असेल.

इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत श्रीकांतची वाटचाल डेन्मार्कच्या अँडर्स अँटनसेनने रोखली होती. इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत श्रीकांतची सलामीची लढत सहकारी एचएस प्रणॉयशी आहे. श्रीकांतने गेल्या आठवडय़ात प्रणॉयला नामोहरम केले होते. प्रणॉयने ऑलिम्पिक विजेत्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनला नमवण्याची किमया साधली होती.

जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावरील बी. साईप्रणीतची पहिली लढत फ्रान्सच्या टोमा पोपोव्हशी होणार आहे. लक्ष्य सेनपुढे सलामीलाच अग्रमानांकित आणि दोन वेळा विश्वविजेत्या केंटो मोमोटाचा अडथळा समोर असेल.

पुरुष दुहेरीत सहाव्या मानांकित सात्त्विसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला पहिल्याच फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे, तर एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीपुढे कोरियाच्या जोडीचे आव्हान असेल. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी पहिल्या लढतीत बल्गेरियाच्या गॅब्रिएला आणि स्टेफानी स्टोईव्हा जोडीशी सामना करतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pv sindhu and k srikanth eye consistency at indonesia open zws

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या