वृत्तसंस्था, नवी दिल्ली : एका दुखापतीतून सावरून तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या केएल राहुलला पुन्हा दुखापतीने घेरले आहे. मात्र, ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगताना अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने राहुलला आगामी आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिले आहे. तसेच दुखापतीतून सावरलेले श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमरा आणि प्रसिध कृष्णा यांचेही एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे.
३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी सोमवारी भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्माला प्रथमच एकदिवसीय संघात संधी देण्यात आली असून अनुभवी लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलला मात्र वगळण्यात आले आहे. आशिया चषकासाठी राहुल आणि अय्यर हे भारतीय संघात परतणार का, याकडे सर्वाचे लक्ष होते. राहुल आणि अय्यर यांच्यावर अनुक्रमे मांडी आणि पाठीच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेतली. श्रेयस आता तंदुरुस्त झाल्याचे आगरकर यांनी सांगितले; परंतु राहुलबाबत अजूनही प्रश्नचिन्हे आहेत. त्यातच एकदिवसीय विश्वचषकालाही फारसा कालावधी शिल्लक नाही. असे असतानाही राहुलला निवडण्याचा धोका पत्करण्यात आला आहे.
‘‘राहुलला जी मूळ दुखापत झाली होती, त्यातून तो सावरला आहे. त्याला वेगळी दुखापत झाली आहे. त्यामुळेच संजू सॅमसन संघासोबत श्रीलंकेला जाणार आहे. आशिया चषकाच्या सुरुवातीला किंवा किमान दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यापूर्वी राहुल तंदुरुस्त होणे आम्हाला अपेक्षित आहे. श्रेयस आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे,’’ असे निवड समितीचे अध्यक्ष आगरकर यांनी सांगितले. वेस्ट इंडिज दौऱ्यातील ट्वेन्टी-२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मालाही एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. २० वर्षीय तिलकचे डावखुरेपण भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल.
लेग-स्पिनर चहलला वगळण्यात आले आहे. दोन मनगटी फिरकीपटूंना संघात स्थान देणे अवघड असल्याने चहलला संघाबाहेर ठेवण्यात आल्याचे आगरकर यांनी स्पष्ट केले. आशिया चषकासाठी ‘चायनामन’ कुलदीप यादवसह रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आशिया चषकात भारतीय संघ सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारताचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पालेकेले येथे होणार आहे.
कोणत्याही क्रमांकावर फलंदाजाचीची तयारी हवी -रोहित
मधल्या फळीतील प्रत्येक फलंदाजाची कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी हवी. राष्ट्रीय संघातील कोणताही क्रमांक एका खेळाडूसाठी राखीव नसल्याचे रोखठोक मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. आशिया चषकासाठी सोमवारी भारतीय संघाची निवड केल्यानंतर रोहित आणि निवड समितीचे नवे अध्यक्ष अजित आगरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बहुतांश वेळा भारतीय संघ ‘बीसीसीआय’कडून ‘ट्विटर’च्या माध्यमातून जाहीर केला जातो. तसेच महत्त्वाच्या स्पर्धासाठी निवड समितीचे अध्यक्ष प्रसारमाध्यमांसमोर येऊन संघाची घोषणा करतात. परंतु या वेळी कर्णधार रोहितनेही पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली.
संघ
- फलंदाज : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा
- यष्टीरक्षक : केएल राहुल, इशान किशन</li>
- अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
- फिरकीपटू : कुलदीप यादव</li>
- वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा
- राखीव : संजू सॅमसन