नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनने चुकांमधून धडा घेणे आवश्यक आहे. त्याच-त्याच चुका करत राहिल्यास सॅमसनच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची भीती असल्याचे मत भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले. तसेच ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आपल्या खेळण्याच्या शैलीत बदल करण्याबाबत विचार केला पाहिजे, असेही अश्विन म्हणाला.

भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत इंग्लंडला ४-१ अशी धूळ चारली. मात्र, भारताच्या या यशात ३० वर्षीय सॅमसनला फारसे योगदान देता आले नाही. तो पाच सामन्यांत मिळून केवळ ५१ धावा करू शकला. जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि साकिब महमूद या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी उसळी घेणारे चेंडू टाकून त्याला अडचणीत टाकले. या मालिकेत वारंवार पूलचा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाल्याचे पाहायला मिळाले. सॅमसनच्या या कामगिरीबाबत अश्विनने चिंता व्यक्त केली.

‘‘सॅमसन अशाच पद्धतीने बाद होत राहिल्याच याचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होईल. नक्की गोलंदाज प्रभावी मारा करत आहे की फलंदाज म्हणून माझ्याच खेळात उणिवा आहेत, असे प्रश्न त्याला पडू लागतील. गोलंदाज ठरावीक टप्प्यावर चेंडू टाकून आपल्याला अडचणीत टाकत आहे, याला कसे सामोरे जायचे? या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे? आपल्या खेळात काय सुधारणा होऊ शकते, असे विचार फलंदाज म्हणून तुमच्या डोक्यात येऊ लागतात. या सगळ्यातून बाहेर पडणे अवघड जाऊ शकते. त्यामुळे सॅमसनने वेळीच चुकांमधून धडा घेणे आवश्यक आहे,’’ असे अश्विन म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सॅमसनप्रमाणेच सूर्यकुमारही इंग्लंडविरुद्ध धावांसाठी झगडताना दिसला. त्याला या मालिकेत केवळ २८ धावा करता आल्या. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडून यापेक्षा चांगली कामगिरी अपेक्षित असल्याचे अश्विनने नमूद केले. ‘‘गोलंदाज एकाच प्रकारचे चेंडू टाकून सूर्यकुमारला अडचणीत टाकत आहेत. तुम्ही एक-दोन सामन्यांत समान पद्धतीने बाद होणे समजण्यासारखे आहे. मात्र, सूर्यकुमारसारखा खेळाडू चुका सुधारत नसेल तर ते योग्य नाही. त्याने आपली खेळण्याची शैली बदलण्याबाबत विचार केला पाहिजे. ठरावीक एका चेंडूवर बाद होत असल्यास सूर्यकुमारने पुढच्या वेळी तो चेंडू सोडून तरी द्यावा, किंवा वेगळ्या पद्धतीने टोलविण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यासारख्या गुणवान फलंदाजाने गोलंदाजाला चुका करायला भाग पाडले पाहिजे,’’ असे अश्विन म्हणाला.