वृत्तसंस्था, विजयनगर : तुषार देशपांडे (३/३४), तनुष कोटियन (२/१८) आणि सिद्धार्थ राऊत (२/२६) यांच्या प्रभावी गोलंदाजी माऱ्यामुळे मुंबईने ब-गटातील सामन्यात आंध्र प्रदेशला नऊ गडी राखून नमवत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मुंबईने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ६ बाद २९० धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. अरमान जाफर (११६) बाद झाल्यानंतर कोटियनने (नाबाद ६३) तळाच्या फलंदाजांच्या साथीने मुंबईला ३३१ धावसंख्येपर्यंत पोहोचवले आणि मुंबईने पहिल्या डावात ९३ धावांची आघाडी घेतली. आंध्रकडून शोएब मोहम्मद खान (४/७३), केव्ही ससिकांथ (३/५६) व ललिथ मोहन (३/११३) यांनी चांगली गोलंदाजी केली.

दुसऱ्या डावातही आंध्र प्रदेशच्या फलंदाजांचा मुंबईच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही आणि त्यांचा डाव १३१ धावांवर आटोपला. त्यांच्याकडून उप्परा गिरिनाथ (२७), रिकी भुई (१६), नितिश रेड्डी (१५) वगळता कोणालाही फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यानंतर अवघ्या ३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाला पृथ्वी शॉच्या (६) रुपात पहिला धक्का बसला. यानंतर सलामीवीर यशस्वी जैस्वाल (नाबाद १७) आणि पहिल्या डावातील शतकवीर अरमान जाफर (नाबाद १७) यांनी मुंबईला १ बाद ४० धावसंख्येपर्यंत पोहोचवत विजय मिळवून दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संक्षिप्त धावफलक

  • आंध्र प्रदेश (पहिला डाव) : २३८
  • मुंबई (पहिला डाव) : १२३ षटकांत सर्वबाद ३३१ (अरमान जाफर ११६, तनुष कोटियन नाबाद ६३; शोएब मोहम्मद खान ४/७३, केव्ही ससिकांथ ३/५६)
  • आंध्र प्रदेश (दुसरा डाव) : ४७.४ षटकांत सर्वबाद १३१ (उप्परा गिरिनाथ २७, रिकी भुई १६; तुषार देशपांडे ३/३४, तनुष कोटियन २/१८)
  • मुंबई (दुसरा डाव) : ६.१ षटकांत १ बाद ४० (यशस्वी जैस्वाल नाबाद १७, अरमान जाफर नाबाद १७; केव्ही ससिकांथ १/१३)