पीटीआय, नवी दिल्ली

अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीसाठी भारतीय संघात स्थान देण्याचा निवड समितीचा निर्णय योग्यच आहे, असे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. श्रेयस अय्यरच्या पाठीला दुखापत झाल्यानंतर रहाणेची निवड करण्यावाचून भारताकडे पर्याय नव्हता, असे शास्त्री म्हणाले.

‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामना लंडन येथील ओव्हल मैदानावर ७ ते ११ जून या कालावधीत होणार आहे. या सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघात रहाणेचा समावेश करण्यात आला आहे. रहाणे जानेवारी २०२२ पासून भारतीय संघाच्या बाहेर होता. परंतु त्याने रणजी करंडक आणि त्यानंतर सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’मध्ये चमक दाखवली आहे. त्याने ‘आयपीएल’मध्ये सहा सामन्यांत १८९.८३च्या सरासरीने २२४ धावा केल्या आहेत. यात मुंबई इंडियन्सविरुद्ध २७ चेंडूंत ६१ धावा व कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २९ चेंडूंत नाबाद ७१ धावांच्या खेळीचा समावेश आहे.

‘‘रहाणेचे भारतीय संघात पुनरागमन झाले याचा मला खूप आनंद आहे. त्याने ‘आयपीएल’च्या दोन-तीन सामन्यांत उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याच्या गाठीशी खूप अनुभव आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे श्रेयसला दुखापत झाल्यानंतर रहाणेचा विचार करण्यावाचून निवड समितीकडे पर्याय नव्हता,’’ असे शास्त्री म्हणाले.‘‘एका सामन्याच्या निकालावर विजेता ठरणार असतो, तेव्हा तुम्हाला अनुभवी खेळाडूंची आवश्यकता असते. दोन वर्षांपूर्वी रहाणेनेच भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकवून दिली होती हे विसरू नका. विराट कौंटुबिक कारणास्तव मायदेशी परतल्यानंतर रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व करताना अलौकिक यश मिळवले होते,’’ असे शास्त्री यांनी नमूद केले.

केवळ ‘आयपीएल’मुळे पुनरागमन नाही!

रहाणेने गेल्या रणजी हंगामात मुंबईकडून सात सामन्यांत ६३४ धावा केल्या होत्या. यात एका द्विशतकाचाही समावेश होता. त्यामुळे रहाणेची केवळ ‘आयपीएल’मधील काही सामन्यांच्या आधारे भारतीय संघात निवड झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे शास्त्री यांना वाटते. ‘‘रहाणेने ‘आयपीएल’च्या तीन सामन्यांत चमक दाखवली आणि त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले असे काही लोकांना वाटत आहे. मात्र, सहा महिने तो प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत होता, याचा बहुधा या लोकांना विसर पडला आहे,’’ असे शास्त्री म्हणाले.