रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन भारताचे आघाडीचे फिरकी गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल दोन स्थानांवर विराजमान आहेत. याचप्रमाणे फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.

अश्विन (८८७ गुण) आणि जडेजा (८७९ गुण) हे अनुक्रमे गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दोन स्थानांवर आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूड (८६० गुण) तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने अप्रतिम कामगिरीसह २९ गुणांची कमाई केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाने क्रमवारीत मोठी मुसंडी मारून नऊ स्थानांनी आगेकूच करीत आठवे स्थान गाठले आहे. अव्वल २० गोलंदाजांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी १९व्या स्थानावर आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत स्टीव्ह स्मिथने सातत्यपूर्ण फलंदाजीच्या बळावर ९३३ गुणांसह आपले अग्रस्थान टिकवून ठेवले आहे. तर कोहली ८७५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल १० फलंदाजांमध्ये अन्य कोणत्याही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे १२व्या आणि १६व्या स्थानावर आहेत.

आयसीसीच्या संघांच्या यादीत भारत १२० गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया १०९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.