भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आता दुबईत होणाऱ्या आयएल टी२० स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. काही दिवसातच लीगच्या आगामी हंगामासाठी लिलाव होणार आहे. लिलावात अश्विनने १,२०,००० अमेरिकन डॉलर्स एवढी बेस प्राईज पक्की केली आहे. १ ऑक्टोबरला दुबईत लिलाव होणार आहे. सहा आकडी बेस प्राईज पक्की करणारा अश्विन लिलावातला एकमेव खेळाडू आहे. अश्विनने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तसंच आयपीएलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. लिलावात कोणत्याही संघाने अश्विनला ताफ्यात समाविष्ट केलं तर विदेशी लीगमध्ये खेळण्याची त्याची ही पहिलीच वेळ असेल. बीसीसीआयच्या नियमानुसार, भारतीय खेळाडूंना अन्य देशात सुरू असलेल्या लीगमध्ये खेळण्याची अनुमती नाही. अश्विनने आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलला रामराम केला असल्यामुळे त्याचा जगभरात कुठेही खेळण्याचा मार्ग सुकर झाला.
३९वर्षीय अश्विन सार्वकालीन महान फिरकीपटूंमध्ये समावेश होतो. टेस्ट, वनडे आणि टी२० मिळून अश्विनच्या नावावर ७५६ विकेट्स आहेत. आयपीएल स्पर्धेत अश्विनच्या नावावर १८७ विकेट्स आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. अश्विनने पंजाब संघाचं नेतृत्वही केलं आहे. आयएल टी२० लिलावात तब्बल ८०० खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये २४ भारतीय खेळाडू आहेत. प्रत्येक संघ किमान १९ आणि कमाल २१ खेळाडूंना लिलावात खरेदी करू करू शकतो. पूर्ण सदस्य अर्थात कसोटी खेळणाऱ्या देशांचे ११ खेळाडू असतील. युएईचे ४ तर सौदी अरेबिया, कुवेत आणि अन्य असोसिएट देशांचे २ असं मिळून संघ पूर्ण होईल.
आयएल टी२० स्पर्धेचा हा चौथा हंगाम असून, ६ संघ सहभागी होणार आहेत. २ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत हा हंगाम खेळवण्यात येईल. संपू्र्ण हंगामात खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं अश्विनने कळवलं आहे. आयएल टी२० नंतर अश्विन बिग बॅश स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. बिग बॅश स्पर्धेतील चार संघांनी अश्विनला ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.
