विशाखापट्टणम : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अपयशास आघाडीच्या फळीतील फलंदाजांचे अपयश कारणीभूत धरण्यास संघ व्यवस्थापन तयार नाही. एका स्पर्धेतील कामगिरीने आघाडीच्या फळीतील फलंदाजांना दोषी धरणे योग्य नाही, असे भारताची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष म्हणाली.

फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवरही भारताच्या प्रमुख फलंदाज आपली छाप पाडू शकल्या नाहीत. सलग तिसऱ्या सामन्यात तळातील फलंदाजाच्या खेळीने भारताचा डाव सावरला गेला. स्मृती मनधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज या प्रमुख फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुन्हा अपयशी ठरल्या आणि भारताचा डाव एकवेळ ६ बाद १०२ असा अडचणीत आला होता. त्यानंतर रिचाने ९४ धावांची खेळी करताना तळातील खेळाडूंसह भारताचा डाव सावरला होता. दक्षिण आफ्रिकेने या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना तीन गडी राखून विजय मिळविला.

‘‘आघाडीच्या फळीत सर्व चांगले फलंदाज आहेत. एका सामन्यात अपयश आल्यावर लगेच त्यांच्याकडे बोट दाखवणे योग्य होणार नाही. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. प्रत्येकवेळी सर्वोत्तम कामगिरी करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असते. यात कधीकधी आघाडीच्या फळीला अपयश येऊ शकते,’’ असे रिचा घोष म्हणाली.

‘‘सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी केल्यानंतर क्रांती गौडाचे एक षटक निर्णायक ठरले. त्या षटकांत डी क्लर्कने दोन षटकार आणि एका चौकाराने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. तोपर्यंत सामना आमच्या नियंत्रणात होता,’’ असे रिचाने सांगितले.

अजून बरेच सामने बाकी आहेत. काय चुकत आहे याचा अभ्यास करून आम्ही चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक सामन्याने आम्हाला वेगळाच धडा दिला आहे. यातूनही मार्ग शोधून आम्ही पुढे जाऊ, असा विश्वासही रिचाने व्यक्त केला.

भारतीय संघाचा डाव सावरण्यात माझी खेळी उपयुक्त ठरली याचा मला आनंद आहे. मी कधीही नियोजन करत नाही. फक्त संधीची वाट पाहते. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करते यापेक्षा माझी खेळी संघासाठी उपयुक्त कशी ठरेल याचा विचार मी अधिक करत असल्याचे रिचाने सांगितले.

माझ्या आवाक्यात असेल, तरच मी फटके मारते. चेंडू आवाक्यात येत नसेल, तर मी समोरच्या फलंदाजाला खेळण्याची अधिक संधी देते. त्यामुळे माझ्यावर प्रत्येकाचा विश्वास आहे आणि याचमुळे मला आत्मविश्वास मिळतो. रिचा घोष, भारतीय महिला संघाची यष्टिरक्षक