संदीप द्विवेदी

Rohit Sharma ODI Captain Demotion: इम्रान खानने १९९२ मध्ये पाकिस्तानला वर्ल्डकप जिंकून दिला तेव्हा तो चाळिशीत होता. २०२७ वर्ल्डकप होईल त्यावेळी रोहित शर्मा चाळिशीत असेल. पण इम्रानप्रमाणे चाळिशीत संघाला जेतेपद मिळवून देताना नेतृत्व करण्याची संधी रोहितकडे नाही. निवडसमितीने रोहितला वनडे कर्णधारपदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. त्याच्याऐवजी २५वर्षीय शुबमन गिलकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा एक अतर्क्य आणि अनपेक्षित असा निर्णय आहे.

कुठलीही आशाआकांक्षा नसलेला, काहीही ध्येयउद्दिष्टं नसलेला माणूसच हा निर्णय ऐकल्यानंतर स्थितप्रज्ञ राहू शकतो. रोहितसाठी, त्याची वनडे कर्णधार म्हणून कारकीर्द अभिमानास्पद अशीच आहे. मोठी स्वप्नं पाहणारा आणि ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा असा तो खेळाडू-कर्णधार आहे. भारताला काही महिन्यांच्या अंतरात दोन आयसीसी जेतेपदं मिळवून देणारा कर्णधार आहे. आपण म्हणजे ऑस्ट्रेलिया नाही. त्यांच्याकडे जेतेपदांची रास आहे. विजयाच्या आनंदापेक्षा समीप होऊन अपेक्षाभंगाची उदाहरणंच आपल्यासाठी जास्त आहेत.

आयसीसी स्पर्धेचं जेतेपद जिंकून देताना फायनलमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावणाऱ्या कर्णधाराला अशा पद्धतीने पदावरून बाजूला करणे भारतीय क्रिकेटला नवीन आहे. वर्ल्डकप जिंकणं हा कोणत्याही कर्णधारासाठी शिरपेचात सर्वोच्च मानबिंदू असतो. वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर रोहितला कर्णधार म्हणून काही सामने तरी त्याचं अढळस्थान गाजवायला मिळायला हवे होते.

अशा पद्धतीने कर्णधारपदावरून बाजूला करण्यामुळे रोहित दुखावला गेला असेल का? यामुळे वनडे प्रकारात खेळण्याची त्याची मनीषा विरुन जाईल का? हे सगळं ज्या पद्धतीने घडलं आहे ते पाहता तो वनडेतूनही निवृत्ती घेईल का? असं होईल का रोहित पेटून उठेल आणि त्याची बॅट तळपू लागेल. त्याला आलेला राग तो बॅटच्या माध्यमातून दाखवून देईल का? काही दशकांपूर्वी जे सचिनने करून दाखवलं ते रोहित शर्मा करेल का? आठवडाभरात रोहित त्याचा वनडे कर्णधारपदाचा वारसदार शुबमन गिलच्या बरोबरीने सलामीला उतरेल त्यावेळी त्याचा दृष्टिकोन जगालाच पाहायला मिळेल आणि प्रश्नांची उत्तरंही मिळतील.

रोहितला वनडे कर्णधारपदावरून बाजूला करून शुबमन गिलकडे ही जबाबदारी सोपवण्याबाबत निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी आपली भूमिका मांडली. यापैकी एक होतं- तीन प्रकारात तीन कर्णधार असतील तर प्रशिक्षकासाठी हे गोंधळाचं असू शकतं. टेस्टमध्ये शुबमन, वनडेत रोहित आणि टी२० मध्ये सूर्यकुमार अशी संरचना झाली असती. हेच जर का कारण असेल तर मग तिन्ही प्रकारात मिळून एकच कर्णधार नेमता आला असता. जेणेकरून निवडसमिती, प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाला सोपं झालं असतं.

आणखी एक कारण देण्यात आलं ते म्हणजे रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर फारसं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. वनडेंची एकूणातच संख्या कमी झाली आहे. रोहितने टेस्ट आणि टी२० प्रकारातून निवृत्त झाला आहे. मग अशा परिस्थितीत कमी सामने खेळणं हा रोहितचा दोष आहे का? वर्ल्डकपपूर्वी वनडे स्पेशालिस्ट खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळता येणं ही बीसीसीआयची जबाबदारी नाही का? रोहितप्रमाणे विराटही आता फक्त वनडेत खेळतो आहे. जगातला सर्वोत्तम असा वनडेतला खेळाडू लंडनमध्ये कशी तयारी करू शकेल?

वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी टेस्ट सुरू होण्यापूर्वी शुबमन गिल वनडे कॅप्टन असेल हे स्पष्ट झालं. वर्ल्डकपमध्ये रोहित आणि विराटचं असणं संघासाठी किती महत्त्वाचं आहे याबद्दल शुबमन बोलला. असं कौशल्य, दर्जा आणि अनुभव असलेले खेळाडूच किती मोजके आहेत. वर्ल्डकपच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत. रोहितने याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला आवडलं असतं. वनडेतल्या कामगिरीपेक्षा त्याचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड अचंबित असा आहे. त्याच्या टेस्टच्या आकडेवारीपेक्षाही वनडे कर्णधारपदाचे आकडे तगडे आहेत.

म्हणूनच रोहितने टेस्टमधून निवृत्तीचा निर्णय घेतला- खरंतर त्याला तसा निर्णय घ्यायला भाग पाडण्यात आलं. त्यानंतर चाहते आक्रस्ताळे झाली नाहीत. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यात मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. शुबमनने ७०० पेक्षा धावा करत फलंदाज आणि कर्णधार म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं केलं. टेस्टमध्ये रोहितकडून शुबमनकडे नेतृत्वाची धुरा अतिशय सहजतेने संक्रमित झाली. भारत इंग्लंड मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघातल्या नव्या ताऱ्यांचा उदय झाला. नवी टीम इंडिया पाहायला मिळाली.

युवा कर्णधार आणि नवे प्रशिक्षक हे समीकरण संघातल्या वरिष्ठ खेळाडूंसाठी अनुकूल नसतं. कारण तोवर त्यांची सद्दी असते. अनुभव आणि युवा यांचं मिश्रण दरवेळेस जिंकून देतं असं नाही. वास्तव जगात, हेच चित्र बहुविध सत्ताकेंद्र आणि जटिल समीकरण असं होऊ शकतं. अशा परिस्थितीत काय निर्णय घेतला जातो- वरिष्ठ खेळाडूला बाजूला सारा आणि नव्या उमेदीच्या शिलेदाराला बळ द्या. पण हा योग्य निर्णय आहे का?

पहिल्यावहिल्या टेस्ट मोहिमेत शुबमनच्या कामगिरीमुळे निवडसमितीने भावनेच्या भरात हा निर्णय घेतला का? शुबमन गिलकडे टेस्ट संघाचं कर्णधारपद सोपवणं हा धाडसी निर्णय होता. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा समावेश असलेल्या वनडे संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे देणं अतरंगी साहस म्हणावं लागेल. नव्या भारताचा उदय याची भलामण करताना सोन्यासारख्या जुन्याला सरसकट निकाली काढण्यात आलं हे विसरून चालणार नाही. वनडे आणि टी२० प्रकारात रोहितचं नेतृत्व हे कोणत्याही युवा कर्णधारासाठी वस्तुपाठ आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. शुबमनने काही वर्ष रोहितच्या नेतृत्त्वात खेळून नेतृत्वाचे धडे गिरवले असते तर त्याच्यासाठी तो उत्तम अभ्यास ठरला असता.

पाच आयपीएल जेतेपदं नावावर असणाऱ्या रोहितला वनडे तसंच टी२० प्रकारात नेतृत्व म्हणजे काय हे चांगलंच ठाऊक आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नावावर अशी जेतेपदं होती. आयसीसीच्या तीन स्पर्धांमध्ये- २०२३ वनडे वर्ल्डकप, २०२४ टी२० वर्ल्डकप आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही स्पर्धांमध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलियासारखा खेळला. ऑस्ट्रेलियाचा संघ जेतेपद पटकावण्यासाठीच खेळला. रिकी पॉन्टिंगचा संघ ज्या पद्धतीने खेळायचा तसं भारतीय संघाचा खेळ पाहून वाटलं. त्या भारतीय संघात अकराच्या अकरा खेळाडू मॅचविनर होते. प्रत्येकाला संघातली भूमिका माहिती होती. परिस्थिती, वातावरण यांचा नूर ओळखून खेळणारी टीम इंडिया होती. प्रत्येक सामन्यासाठी त्यांच्याकडे डावपेच आणि योजना होती. त्यांना खेळताना पाहणं अतिशय आनंददायी होतं. क्रिकेटवेड्या देशातल्या चाहत्यांनी बेभान व्हावं असा त्यांचा खेळ होता.

या संघाचा विश्वास कमावणं यासाठी एकच गोष्ट करता येऊ शकते- स्वत:च्या खेळातून असं इम्रान खान म्हणाला होता. रोहितने अगदी तस्सच केलं. भारतीय संघ फायनलपर्यंत अपराजित होता याचं कारण रोहितने संघासमोर स्वतचा आदर्श ठेवला. २०२३ वनडे वर्ल्डकपदरम्यान संघाला धडाकेबाज सलामी मिळवून देण्याची जबाबदारी रोहितने स्वत:कडे घेतली आणि निभावलीही. त्याने अव्वल दर्जाच्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेत धावा लुटल्या.

डोक्यात असंख्य कल्पना असणारा मात्र पाय भक्कमपणे जमिनीवर असलेला असा तो कर्णधार होता. २०२४ टी२० वर्ल्डकपपूर्वी पत्रकार परिषदेत त्याने सांगितलं की आमचे डावपेच ठरले आहेत. फिरकीपटू भारताच्या योजनेचा मुख्य भाग असतील हे रोहितने स्पष्ट केलं. भारताने हे डावपेच शिताफीने अवलंबले. ऋषभ पंतला बढती देणं, अक्षर पटेलचा बॅट्समन म्हणून उपयोग करून घेणं, मधल्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला आणणं हे रोहितच्या डोक्यातील योजना होत्या. भारताच्या विजयात याच गोष्टी निर्णायक ठरल्या.

चाहत्यांची स्मृती मर्यादित असते असं म्हणतात. निवडसमितीचीही स्मृती तशीच असावी. वनडे वर्ल्डकप काळात अनुभवी कर्णधाराची आवश्यकता असते. संघाची चोख माहिती असलेला कर्णधार आवश्यक असतो. आताचा भारतीय संघ हा रोहितने बांधलेला संघ आहे. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला तेव्हापासून रोहित त्याला पाहतो आहे. कुलदीप यादवला विश्वासात घेऊन बळ देणारा रोहितच होता. रवींद्र जडेजाबरोबर रोहितने २००६ U19 वर्ल्डकप खेळला होता. श्रेयस अय्यरचा तो मित्र आहे.

शुबमन गिलला वनडे कर्णधार करण्याची एवढी घाई करण्याची खरंच गरज नव्हती. रोहितला आणखी एक स्पर्धा तरी कर्णधारपदी राहू देता आलं असतं. वयस्क होत जाणाऱ्या कर्णधारासाठीची ही दया याचिका नाही किंवा करुणा भाकण्याचा विषय नाही. वनडे क्रिकेटमधल्या एका मोठ्या खेळाडूला आणि नेतृत्वगुणांमध्ये आधुनिक ब्रेअर्ली असणाऱ्या कर्णधाराचा सन्मान करण्याचा मुद्दा होता. त्याने जे कष्टाने कमावलं त्याला ते जोपासू देण्याचा विषय होता. इम्रान खान चाळिशीत कदाचित फिट नसेल मात्र चाळिशीत त्याचा मेंदू तल्लख होता आणि सहकाऱ्यांना प्रेरित करेल असा खेळ करण्याची ताकद त्याच्यात होती.