मुंबई : रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शुक्रवारी मुंबई रणजी संघाचा आपला माजी सहकारी अभिषेक नायरसह शिवाजी पार्क येथे जवळपास दोन तास सराव केला. नायर यांनी भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी पार पाडली आहे.
रोहितच्या जागी शुभमन गिलला भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. रोहित १९ ऑक्टोबरपासून पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करेल. ऑल हार्ट क्रिकेट अकादमीच्या या सराव सत्रादरम्यान मुंबईचा क्रिकेटपटू अंगक्रिश रघुवंशी आणि काही स्थानिक खेळाडू उपस्थित होते. रोहितला खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी शिवाजी पार्क येथे गर्दी केली होती.
३८ वर्षीय रोहितने यावर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना खेळला होता. भारताने या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर चॅम्पियन्स करंडकही उंचावला. रोहितच्या भविष्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, त्याचा संघसहकारी विराट कोहलीसह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आले. रोहित व विराटने कसोटी व ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित, कोहली व नवनियुक्त उपकर्णधार श्रेयस अय्यर १५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी नवी दिल्लीत भारतीय संघासोबत येतील. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे.