Ravichandran Ashwin Shares Dressing Room Mood: २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना अश्रू ढाळताना, निराश पाहून एकाच वेळी १४० कोटी भारतीयांची मने दुखावली गेली होती असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पण हीच स्थिती जवळून अनुभवणे किती दुःखद होते हे आता रविचंद्रन आश्विनने एका मुलाखतीत सांगितले आहे. संपूर्ण विश्वचषकात १० सामने जिंकूनही अंतिम टप्यात भारताला बहुप्रतीक्षित यशाला गवसणी घालता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीला पीचची सुद्धा साथ लाभली आणि भारताने पहिला डाव अवघ्या २४० धावांमध्ये उरकला तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला संध्याकाळी दुसऱ्या सत्रात फलंदाजी करताना सुद्धा पीच मुळे हातभार लागला आणि अवघ्या ४२ षटकात ऑसीजनी विश्वचषक आपल्या नावे केला.
एस बद्रीनाथ यांच्याशी त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विनने अंतिम पराभवानंतरच्या काही दुःखद क्षणांविषयी भाष्य केले. अश्विनने विराट आणि रोहित यांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना म्हटलं की, “रोहित आणि विराट जेव्हा रडत होते ते पाहून खूप वाईट वाटलं, आम्हाला ते दुःख जाणवत होतं. हा संघ अनुभवी खेळाडूंचा होता आणि प्रत्येकाला काय करावं हे माहित होतं. ते सगळेच प्रोफेशनल होते. प्रत्येकाचं रुटीन, सराव सर्व काही ठरलं होतं. या दोन्ही खेळाडूंनी संघातील प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं होतं एक माहोल तयार केला होता.”
हे ही वाचा<< विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत सचिन तेंडुलकरचं महत्त्वाचं विधान; म्हणाला, “त्याचा प्रवास थांबला..”
दरम्यान, विश्वचषक संपताच टीम इंडिया कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पाच टी २० सामन्यांची मालिका खेळत आहे. सध्या २-१ च्या विजयाने भारत आघाडीवर आहे. तर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सुद्धा लवकरच संघ घोषित होणार असून यात विराट कोहलीने कसोटी वगळून अन्य दोन प्रकारांमध्ये ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा भाग असणार का हे अजून स्पष्ट झालेले नाही.