चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या निवड समितीने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यादरम्यान त्यांनी वनडे संघाचा नवा कर्णधार रोहित शर्माबाबतही घोषणा केली. विराट कोहलीच्या जागी हिटमॅनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित वनडेचा कर्णधार बनल्यानंतर आता त्याचे १० वर्ष जुने ट्वीट व्हायरल होत आहे. इंटरनेटवर कधीही काहीही लपून राहत नाही, असे म्हटल्याप्रमाणे, रोहितने २०११ साली केलेले हे ट्वीट या गोष्टीची साक्ष देते. रोहित शर्माला २०११ क्रिकेट विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही, त्यानंतर त्याने हे ट्वीट केले होते.
२०११ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला, तेव्हा त्यात हिटमॅनचा समावेश नव्हता. ज्यानंतर रोहितने आपली निराशा व्यक्त करत ट्वीट केले होते. ”विश्वचषक संघात निवड न झाल्याने मी खूप निराश आहे, पण मला पुढे जाण्याची गरज आहे, पण खरे सांगायचे, तर हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता”, असे रोहितने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.
संघात निवड न झाल्याबाबत रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले होते, ”रोहित विश्वचषक ट्रॉफीवर हात ठेवण्यास चुकला. २००७-०९ या काळात त्याने चांगला खेळ केला आणि झिम्बाब्वेविरुद्ध दोन शतके झळकावली, त्यानंतर २००९ ते २०११ दरम्यान तो प्रसिद्धी आणि पैशामुळे विचलित झाला. तो क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत नव्हता. त्यामुळे त्याला २०११ च्या विश्वचषकातून वगळण्यात आले, कारण त्यावेळी त्याची कामगिरी चांगली झाली नाही.”
“हे त्याच्यासाठी खूप धक्कादायक होते, मी रोहितला माझ्या घरी बोलावले आणि त्याला म्हणालो, ऐक रोहित, तुला माहीत आहे, की तू इथे क्रिकेटमुळे का आला आहेस, तुला क्रिकेटमधून प्रसिद्धी, पैसा, सर्व काही मिळाले. पण आता तू क्रिकेटची काळजी घेत नाहीस, म्हणून मी तुला विनंती करतो, की कू फक्त सराव सुरू कर. विराट कोहली तुझ्या पाठोपाठ आला आणि तो २०११ च्या विश्वचषक संघात आहे, फरक बघा आता तुला तुझ्या क्रिकेटची काळजी घ्यावी लागेल”, असे लाड यांनी त्यावेळी रोहितला मार्गदर्शक म्हणून सांगितले होते.
आज १० वर्षानंतर रोहित भारताच्या टी-२० आणि वनडे संघाचा कर्णधार बनला आहे. या काळात मेहनतीमुळे रोहितने इतक्या उंचीवर झेप घेतली असून चाहत्यांना त्याच्याकडून अजून प्रगतीची अपेक्षा आहे.