‘कप्तान’ म्हणून रोहित शर्मा ठरलाय सुपरहिट; वर्ल्डकपमध्ये तोच असणार भारताचा…

आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर रोहितला एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कप्तान बनवणार असल्याची चर्चा रंगत आहे.

rohit sharmas captaincy record for team india
रोहित शर्मा आणि विराट कोहली

बऱ्याच दिवसांपासून रोहित शर्माला टीम इंडियाची कमान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर विराट कोहलीऐवजी रोहितला टी-२० आणि एकदिवसीय संघाची कमान दिली जाऊ शकते. आयपीएलमध्ये रोहितने स्वतःला कर्णधार म्हणून सिद्ध केलेले आहे, सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याने टीम इंडियाला ८० टक्के सामन्यांमध्ये विजयाकडे नेले आहे. या कारणास्तव तो बीसीसीआयच्या विश्वासू खेळाडूंपैकी एक आहे.

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयसीसी ट्रॉफी व्यतिरिक्त अजून आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. त्याचबरोबर रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. रोहितने टीम इंडियासाठी आतापर्यंत २९ सामन्यांचे नेतृत्व केले आहे. यात त्याने २३ सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला, तर केवळ ६ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. रोहित आपल्या खेळाडूंना दबावाखालीही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसला आहे.

रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला १५ टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. टी-२० मध्ये भारतासाठी तो तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने ४१ आणि विराट कोहलीने २७ टी-२० सामने जिंकले आहेत. रोहितने आतापर्यंत १९ टी-२० सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्याला ४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने १० पैकी ८ सामने जिंकले आणि फक्त दोन सामने गमावले आहेत.

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंकेने निवडला Mystery स्पिनर; तीन प्रकारचे चेंडू टाकून फलंदाजाची…

२०१८ मध्ये टी-२० आशिया चषकात, भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला आणि त्यांनी विजेतेपदही मिळवले. अंतिम फेरीत संघाने बांगलादेशचा ३ विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाला २०२३ मध्ये मायदेशात एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. याआधी रोहितला त्याच्यानुसार खेळाडूंना तयार करण्याची संधी मिळेल. त्यामुळे बोर्डालाही रोहितला तयारीसाठी पुरेसा वेळ द्यायचा आहे. या स्पर्धेत रोहितच भारताचे नेतृत्व करेल, असा सर्वांना ठाम विश्वास आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rohit sharmas captaincy record for team india adn