Sachin 50th Birthday Celebration Sindhudurg : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काल त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठी सचिन कोकणात दाखल झाला आहे. कोकणातल्या समूद्र किनाऱ्यांवर तो मनसोक्त फिरतोय. सोमवारी सचिन वेंगुर्ल्याजवळच्या भोगवे बीचवर फिरला. यावेळी सचिनमधला अग्रही मराठी माणूस पाहायला मिळाला.

भोगवे समुद्र किनाऱ्यावर फिरल्यानंतर सचिनने जवळच्याच एका हॉटेलमध्ये मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला. आता सचिन तेंडुलकर दिसल्यानंतर चाहते त्याच्या अवती भोवती जमणारच. जेवूण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडताना तसंच झालं. सचिन कारमध्ये बसत असताना काही चाहते तिथे जमले. तिथे सचिनची स्वाक्षरी (ऑटोग्राफ) घेण्यासाठी आलेला एक चाहता सचिनशी हिंदीत बोलत होता. सचिनने त्याचं नाव विचारल्यावर सचिनच्या लक्षात आलं हा तर मराठी आहे. तेव्हा सचिन त्याला म्हणाला, “मराठी आहात ना? मग मराठीत बोला.” हा सल्ला देत सचिनने चाहत्याला स्वाक्षरी दिली.

सचिनने यंदा त्याचा वाढदिवस भारतातच साजरा केला. तो आधी गोव्याला जाऊन तिथून तो सिंधुदुर्गमध्ये दाखल झाला. वेंगुर्ल्याजवळच्या भोगवे बीचवर फिरल्यानंतर या बीचवरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याने मालवणी जेवणाचा आनंद घेतला. त्याचवेळी काही चाहत्यांना सचिनची स्वाक्षरी मिळवता आली तर काहींनी सेल्फी घेतले.

हे ही वाचा >> आयपीएल २०२३ मध्ये अजिंक्य रहाणेच नंबर वन! धोनी-मॅक्सवेलला मागे टाकत ‘या’ बाबतीत ठरला हिरो

सचिनसाठी ‘२४ तारीख’ आहे खूपच खास

सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिलला झाला असून त्याचे २४ या तारखेशी खूप खास नाते आहे.
सचिनच्या विवाहाची तारीख २४ मे १९९५
अर्जुन तेंडुलकरचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी झाला.
सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द २४ वर्षांची
सचिनने २४ फेब्रुवारी १९८८ रोजी हॅरिस शिल्डच्या उपांत्य फेरीत विनोद कांबळीसोबत ६६४ धावांची नाबाद भागिदारी केली.
२४ नोव्हेंबर १९८९ सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं.
२४ फेब्रुवारी २०१० रोजी सचिन एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला