भारताचा अष्टपैलू शार्दूल ठाकूरला शुक्रवारी मुंबई संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. तर, सर्फराज खान आणि अजिंक्य रहाणे यांनाही जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी करंडक २०२५-२६ च्या पहिल्या सामन्यात १६ सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. शार्दूलला रहाणेच्या जागी मुंबईचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.४२ रणजी जेतेपदे मिळवणारा मुंबईचा संघ हंगामातील आपला पहिला सामना १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळणार आहे. गेल्या हंगामात मुंबईच्या संघाला जम्मू-काश्मीरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईला हिमाचल प्रदेश, दिल्ली, हैदराबाद, राजस्थान, छत्तीसगड आणि पॉन्डिचेरीसह एलिट ‘ड’ गटात ठेवण्यात आले आहे.
भारतीय फलंदाज सर्फराज खान व अष्टपैलू शिवम दुबे यांचाही संघात समावेश आहे. २०२४-२५ च्या हंगामात दुखापतीमुळे स्थान न मिळालेल्या मुशीर खानचे संघात पुनरागमन झाले आहे. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आयुष म्हात्रे यालाही संघात स्थान मिळाले आहे. श्रेयस अय्यरने लाल चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात स्थान न मिळालेला पृथ्वी शॉ या हंगामात महाराष्ट्राकडून खेळणार आहे.
मुंबईचा संघ : शार्दूल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सर्फराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसूझा, इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.