Why Shreyas Iyer is Taking Break from Test: भारतीय संघाचा मधल्या फळीतला फलंदाज श्रेयस अय्यरला कसोटी क्रिकेट सातत्याने हुलकावणी देत आहे. २०२१ मध्ये श्रेयसने कानपूर इथे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. त्यानंतर चार वर्षात भारतीय संघ ३८ टेस्ट खेळला आहे. त्यापैकी श्रेयस फक्त १४ मध्ये भारतीय संघाचा भाग होता. श्रेयस तब्बल २४ कसोटीत दुखापत किंवा फॉर्म या कारणांमुळे खेळू शकलेला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मात्र या संघात श्रेयसची निवड होणार नाही.
श्रेयस अय्यरने रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेत असल्याचं निवडसमितीता कळवलं आहे. दुखापतीच्या कारणास्तव श्रेयसने रेड बॉल क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाठीचं दुखणं बळावल्याने श्रेयसने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या लढतीतून श्रेयसने अगदी आयत्याक्षणी माघार घेतली. श्रेयसच्या ऐवजी ध्रुव जुरेलकडे भारत अ संघाची धुरा सोपवण्यात आली.
१४ कसोटीत श्रेयसने ३६.८६च्या सरासरीने ८११ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याची अनोखी कामगिरीही श्रेयसच्या नावावर आहे. पदार्पणाच्या कसोटीत ११५ आणि ६५ धावांच्या खेळीकरता श्रेयसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९२ आणि ६७ धावांच्या संयमी खेळीसाठी श्रेयसला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. श्रेयसने इंग्लंडमध्ये १ तर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी सामने खेळले आहेत.
कानपूरला पदार्पण आणि वानखेडेवर पुढची कसोटी खेळल्यावर दक्षिण आफ्रिकेत झालेली तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रेयस संघात नव्हता. यानंतर मायदेशात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेत श्रेयस खेळला. इंग्लंडविरुद्ध बर्मिगहॅम कसोटी खेळला. बांगलादेशात झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी बजावली. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत तो खेळू शकला नाही. यानंतर झालेल्या दिल्ली, इंदूर, अहमदाबाद कसोटीत त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल लढतीत तो संघाचा भाग नव्हता. वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो संघात नव्हता. दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियन आणि केपटाऊन कसोटीत तो पुन्हा संघात परतला. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असताना पाच कसोटींपैकी श्रेयस हैदराबाद आणि विशाखापट्टणम कसोटीत खेळला.
गेल्या वर्षी २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत विशाखापट्टणम इथे झालेली कसोटी श्रेयसची शेवटची कसोटी आहे. त्यानंतर पावणेदोन वर्ष तो कसोटी संघाचा भाग होऊ शकलेला नाही. या काळात साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पड्डीकल, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, रजत पाटीदार, यशस्वी जैस्वाल, इशान किशन यांनी भारतासाठी पदार्पण केलं. यापैकी काहीजण अंतिम अकरात स्थिरावले. पण श्रेयस संघात आतबाहेर होतो आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा या वरिष्ठ खेळाडूंनी कसोटी प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर खांदेपालट होणं अपेक्षित होतं.वनडे आणि टी२० प्रकारात दमदार कामगिरी नावावर असणाऱ्या श्रेयसचा कसोटी संघात समावेश होणं स्वाभाविक मानलं जात होतं. मात्र तसं झालेलं नाही.
आयपीएलमधील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, अय्यरला सध्या सुरू असलेल्या आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची अपेक्षा होती, परंतु त्याला संघात स्थान मिळालं नाही आणि स्पर्धेसाठी त्याची निवड न झाल्याबद्दल माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. भारत अ संघ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही. मोठ्या धावसंख्येचा हा पहिला सामना अनिर्णित राहिला.