Top 5 Big Decisions In India Tour Of Australia Team Selection: भारतीय संघ येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. कसोटी संघानंतर आणि वनडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देखील युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या संघाचा भाग असणार आहेत. मात्र शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. दरम्यान जाणून या संघनिवडीतील ५ महत्वाचे मुद्दे
१) शुबमन गिलची कर्णधार म्हणून निवड
या संघ निवडीतील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय वनडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलच्या हाती सोपवण्यात आली आहे.रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कसोटी संघाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर आशिया चषक स्पर्धेआधी भारतीय टी-२० संघाची जबाबदारी देखील शुबमन गिलकडे सोपवली गेली होती. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट- रोहित गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहेत.
२)श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी
श्रेयस अय्यरला इंग्लंड दौऱ्यासाठी आणि आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. मात्र आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. श्रेयस अय्यर भारतीय अ संघाचा कर्णधार देखील आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसेल.
३) रोहित- विराटचं पुनरागमन
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करतील अशी चर्चा सुरू होती. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोघांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. यावरून हे तर स्पष्ट झालं आहे की, दोघंही इतक्यात तरी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार नाहीत.
४) जसप्रीत बुमराहला विश्रांती
भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या वनडे मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय त्याचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी घेतला गेला असावा असं म्हटलं जात आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि प्रसिध कृष्णा यांना स्थान देण्यात आलं आहे. वनडे मालिकेतून बाहेर असला, तरीदेखील टी-२० मालिकेत तो पुनरागमन करताना दिसून येणार आहे.
५) ध्रुव जुरेलला संधी
वेस्टइंडिजविरूद्धच्या पहिल्याच कसोटीत दमदार शतक झळकावणाऱ्या ध्रुव जुरेलचा भारतीय वनडे संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. या संघात केएल राहुल प्रमुख यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. पण ऋषभ पंत पूर्णपणे फिट नसल्यामुळे ध्रुव जुरेलला संघात स्थान दिलं गेलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा आहे भारताचा वनडे संघ:
शुबमन गिल (कर्णधार) रोहित शर्मा, विराट कोहली , श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल.