वृत्तसंस्था, अहमदाबाद
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अडीच दिवसांतच विजय मिळवला. भरीव सांघिक कामगिरी हे भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य राहिले आणि हाच धागा पकडून कर्णधार शुभमन गिल याने आमच्यासाठी हा एक परिपूर्ण सामना असल्याची टिप्पणी केली.
सलग सहाव्या कसोटी सामन्यात भारताला नाणेफेकीचा कौल गमवावा लागला होता. मात्र, याने फारसा फरक पडत नसल्याचे गिल म्हणाला. ‘‘नाणेफेकीचा कौल नाही, तर तुमची मैदानावरील कामगिरी सामन्याचा निकाल ठरवत असते. त्यामुळेच जोपर्यंत आम्ही जिंकत आहोत, तोपर्यंत याचा आम्हाला काही फरक पडत नाही. तीन शतके, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण आणि अचूक गोलंदाजी अशी तीनही आघाड्यांवर चांगली कामगिरी झाल्यामुळे तक्रारीला जागाच नाही. खऱ्या अर्थाने आमच्यासाठी हा परिपूर्ण सामना होता,’’ असे गिलने सांगितले.
खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती असे सांगून गिलने तीनही शतकवीर फलंदाजांचे अभिनंदन केले. ‘‘आमच्या मधल्या फळीने चांगला संयम दाखवला. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीने आम्हाला तारले. त्यांनी फलंदाजीचा आनंद घेतला आणि दिला,’’ असे गिल म्हणाला.
कर्णधार गिलने भारताच्या फिरकी गोलंदाजीचेही कौतुक केले. ‘‘तुमच्याकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज असतात, तेव्हा गोलंदाजीत बदल करणे कठीण असते. मात्र, कमी पर्यायापेक्षा अधिक पर्याय असणे कधीही उत्तमच. भारतात खेळण्याचे आव्हान आणि त्याचा सामना करण्याची मजा काही वेगळीच असते,’’ असेही गिल म्हणाला.
दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेस आपल्या संघाच्या कामगिरीवर निराश होता. ‘‘नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १६२ धावांत सर्व संघ बाद होणे यापेक्षा खराब सुरुवात असूच शकत नाही. अशा वेळी तुमचे आव्हान टिकवणे कठीण असते. अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती,’’ असे चेस म्हणाला.
अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जडेजाने फलंदाजीवर घेत असलेल्या मेहनतीचे फळ मिळत असल्याचे नमूद केले. ‘‘तंदुरुस्तीवर भर दिल्याचा मला अधिक फायदा झाला. यापूर्वी मी आठव्या, नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो, आता मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्यामुळे मला मनासारखी फलंदाजी करण्याची संधी मिळते. उपकर्णधार म्हणून खेळताना फार काही वेगळे वाटत नाही. जेव्हा संघाला काही हवे असते, तेव्हा मी कायमच उपलब्ध असतो आणि ती जबाबदारी आनंदाने पार पाडत असतो,’’ असे जडेजा म्हणाला.
