Shubman Gill World Record: शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध कसोटीत २६९ धावांची विक्रमी खेळी करत क्रिकेटच्या रेकॉर्डबुकमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. गिलने इंग्लंड दौऱ्यावर धावांचा पाऊस पाडला आहे. पहिल्या कसोटीत शतक झळकावलं होतं. गिलने पहिल्या कसोटीत १४७ धावा करत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील मोठी धावसंख्या नोंदवली. तर दुसऱ्या कसोटीत त्याने द्विशतक झळकावत अनेक मोठे विक्रम केले आहेत. ज्यात त्याने एक विश्वविक्रमही आपल्या नावे केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने ३८७ चेंडूत २६९ धावा केल्या, ज्यात ३० चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. गिलशिवाय यशस्वी जैस्वाल (८७ धावा) आणि रवींद्र जडेजा (८९ धावा) यांनी अर्धशतकं झळकावली. वॉशिंग्टन सुंदरनेही ४२ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच संघ ५८७ धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. तर आता प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघाने ५ विकेट्स गमावल्यानंतर ब्रुक आणि स्मिथच्या २०० अधिक धावांच्या भागीदारीच्या चांगल्या स्थितीत आहे.
शुबमन गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिलं द्विशतक आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावले आहे. २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने २०८ धावांची खेळी केली होती. आता गिलने कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावलं आहे. गिलच्या आधी वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि ख्रिस गेल यांनी कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही फॉरमॅटमध्ये द्विशतकं केली आहेत.
शुबमन गिलने कोणता वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे?
आता मोठी गोष्ट म्हणजे शुबमन गिल हा कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने वयाच्या २५ व्या वर्षी दोन्ही फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम रचला आहे. क्रिकेट जगतात त्याच्या आधी कोणत्याही फलंदाजाला इतक्या कमी वयात दोन्ही फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावता आले नव्हते.
शुबमन गिलने २०२० मध्ये भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो संघाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी ३४ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २३१७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ७ शतकं आणि ७ अर्धशतकं झळकावली आहेत. दरम्यान आता रोहित शर्माचा कसोटीमधील उत्तराधिकारी म्हणून संघाची धुरा त्याला सोपवण्यात आली आहे. गिलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावला आहे.