‘इंडियन प्रीमियर लीग’ या क्रिकेट स्पर्धेची लोकप्रियता बघता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने स्वत:ची स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीपासून ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पहिल्या हंगामामध्ये एकूण सहा संघ खेळवण्याची तयारी झाली आहे. या संघांची लिलाव प्रक्रिया संपली आहे. हे सर्वच्या सर्व सहा संघ आयपीएलमधील संघ मालकांनी विकत घेतले आहेत.

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी दक्षिण आफ्रिकेतील टी २० लीगमधील संघ विकत घेतले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी या लीगला ‘मिनी आयपीएल’ असे संबोधण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई इंडियन्सच्या मालकांनी केपटाऊन, चैन्नई सुपर किंग्जच्या मालकांनी जोहान्सबर्ग, लखनऊ सुपर जायंट्सच्या मालकांनी डरबन, दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी प्रिटोरिया, राजस्थान रॉयल्सच्या मालकांनी पार्ल आणि सनरायझर्स हैदराबादच्या मालकांनी पोर्ट एलिझाबेथ फ्रँचायझी खरेदी केली आहे.

हेही वाचा – ऋषभ पंत बसणार मिर्झापूरच्या गादीवर! खराखुरा मुन्ना भैय्या म्हणाला, “तू योग्य…”

दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने सर्व फ्रँचायझींचे अभिनंदन आणि स्वागत केले आहे. “जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकन लीगमध्ये आमच्या नवीन फ्रँचायझी मालकांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी हा खरोखरच रोमांचक काळ आहे”, असे स्मिथ म्हणाला.