Sourav Ganguly On Virat Kohli And Rohit Sharma : टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरोधात पुढील महिन्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या टी-२० मालिकेसाठी बुधवारी ५ जुलैला भारतीय संघाची घोषणा केली होती. १५ सदस्यांच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असणार आहे. तर स्टार फलंदाज विराट कोहली आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाहीय. अशातच टी-२० च्या संघाच्या निवडीबाबत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० संघात नसल्याने गांगुलीने प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन्ही दिग्गज खेळाडू अजूनही टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी योगदान देऊ शकतात, असं गांगुलीनं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना सौरव गांगुली नेमकं काय म्हणाला?

गांगुलीने एका स्पोर्ट्स माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया देत म्हटलं, “तुम्ही चांगल्या खेळाडूंची निवड केली पाहिजे, हे नक्कीच. ते कोणते खेळाडू आहेत, यामुळे काही फरक पडत नाही. विराट कोहली-रोहित शर्मा या दोघांना अजूनही टी-२० क्रिकेटमध्ये स्थान आहे. कोहली-रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय सामने का खेळू शकत नाही, हे मला समजत नाहीय. कोहली आयपीएलदरम्यान जबरदस्त फॉर्ममध्ये होता. दोन्ही खेळाडू टी-२० क्रिकेटमध्ये अजूनही योगदान देऊ शकतात, असं मला वाटतं.”

नक्की वाचा – टीम इंडियात पुनरागमनाबाबत पृथ्वी शॉने केलं मोठं विधान, म्हणाला, “मला पुजारासारखी फलंदाजी…”

रोहित आणि कोहलीशिवाय आयपीएल स्टार्स रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड आणि जितेश शर्मालाही टी-२० मध्ये संधी मिळवण्यात अपयश आलं आहे. यावर बोलताना गांगुली म्हणाला की, युवा खेळाडूंनी खेळत राहावं. त्यांची वेळ नक्कीच येईल. त्यांनी फक्त खेळत राहणं महत्वाचं आहे. फक्त १५ खेळाडूंची संघात निवड करू शकतात आणि ११ खेळू शकतात. त्यामुळे कुणालातरी मुकावं लागणार. त्यांची वेळ नक्कीच येईल, असा मला विश्वास आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतचा टी-२० संघ : ईशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कप्तान), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.