आयसीसीने बुधवारी टी-२० क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजांचा क्रमवारीत भारताचा नवा स्टार सूर्यकुमार यादव आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचे ८५९ रेटिंग गुण आहेत. तो दुसऱ्या स्थानावर असलेल्या मोहम्मद रिझवानपेक्षा २३ गुणांनी पुढे आहे. रिझवानचे ८३६ रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमार यादवशिवाय भारताचा दुसरा कोणताही फलंदाज टॉप १० मध्ये नाही. विराट कोहली ११व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर अष्टपैलू रँकिंगमध्ये हार्दिक पंड्या पहिल्या दहामध्ये सामील झाला आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. हार्दिक आणि सूर्यकुमार यांच्याशिवाय कोणताही भारतीय खेळाडू टी-२० क्रमवारीत पहिल्या १० मध्ये नाही.

सूर्यकुमारने या टी-२० विश्वचषकात पाच डावात तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च ८६९ रेटिंग गुण गाठले आहेत. तथापि, उपांत्य फेरीत तो केवळ १४ धावा करू शकला आणि त्याचे ८५९ रेटिंग गुण आहेत. या विश्वचषकात त्याने ५९.७५ च्या सरासरीने आणि १८९.६८ च्या स्ट्राईक रेटने २३९ धावा केल्या. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता.

टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीतही बरीच कमाई केली आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा करणाऱ्या अॅलेक्स हेल्सने २२ स्थानांची झेप घेत १२व्या स्थानावर पोहोचला आहे. या विश्वचषकात हेल्स इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. टी-२० विश्वचषकात त्याने ४२.४० च्या सरासरीने २१२ धावा केल्या.

या वर्षाच्या सुरुवातीला पुनरागमन केल्यापासून हेल्स शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने २०२२ मध्ये ३०.७१च्या सरासरीने आणि १४५.२७ च्या स्ट्राइक रेटने ४३० धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे चौथ्या आणि एडन मार्कराम पाचव्या स्थानावर आहे. बाबर आझम आणि रिले रुसो यांनाही टॉप १० मध्ये फायदा झाला आहे. बाबरने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावले आणि तो एका स्थानाने पुढे जाऊन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सच्या पुढे आठव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या आदिल रशीदने सर्वाधिक कमाई केली आहे. भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत आणि पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली. राशिदने भारताविरुद्ध १/२० आणि पाकिस्तानविरुद्ध २/२२ विकेट्स घेतल्या. त्याला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानावर आला आहे.

इंग्लंडच्या सॅम करनने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात १२ धावांत तीन विकेट घेतल्या आणि तो सामनावीर ठरला. त्याला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा अव्वल स्थानावर कायम आहे. तर राशिद खान दुसऱ्या स्थानावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाकिब अल हसन, मोहम्मद नबी आणि हार्दिक पंड्या हे अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल तीन स्थानांवर आहेत.