टी-२० विश्वचषक २०२१ साठी बीसीसीआयने महेद्रसिंह धोनीला भारतीय संघाचा मेंटॉर बनवले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने विश्वचषकानंतर टीम इंडियाचे टी-२० कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. या सर्व घडामोडींबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदने आपली प्रतिक्रिया दिली आहे. या मेगा इव्हेंटमध्ये भारतावर दबाव असल्याने हे निर्णय घेण्यात आल्याचे, अहमदने म्हटले.

तन्वीर अहमद म्हणाला, ”भारत एक अव्वल संघ आहे परंतु त्यांची अलीकडील कामगिरी फार प्रभावी राहिली नाही. भारताच्या संघातील बहुतेक खेळाडू आयपीएलच्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये नाहीत. संघ दबावाखाली आहे. भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात वाईट रीतीने पराभूत केले, ज्यात काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही. कागदावर भारत एक अव्वल संघ आहे यात शंका नाही. ज्या पद्धतीने त्यांनी जगभरात क्रिकेट खेळले आहे, परंतु तुम्ही अलीकडील कामगिरीकडे पाहावे. सर्वप्रथम मला विराट कोहलीबद्दल बोलायचे आहे. त्याच्यावर खूप दबाव होता आणि त्याने टी-२० कर्णधारपद सोडले.”

हेही वाचा – “CSK शिवाय तो…”, महेंद्रसिंह धोनीबाबत एन. श्रीनिवासन यांचं मोठं वक्तव्य!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तो पुढे म्हणाला, “कदाचित ते दडपणाखाली होते, म्हणून त्यांनी धोनीला मेंटॉर म्हणून आणले. जर तुम्ही आयपीएल बघितले, तर भारतीय संघातील खेळाडू पहिल्या १० जणांत नव्हते. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी खास कामगिरी केली नाही. जर तुम्ही पाकिस्तानकडे पाहिले तर ते दुबईमध्ये बराच काळ क्रिकेट खेळत आहेत, त्यांना परिस्थितीची चांगली कल्पना आहे. भारताकडे एक चांगला संघ आहे, पण टी-२० क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू येऊन सामने जिंकू शकतो.”

भारत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने टी-२० वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करणार आहे. २४ ऑक्टोबरला हा सामना होईल.