भारताचा माजी फंलदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नेटकऱ्यांना एका व्यक्तीला शोधण्याची विनंती केली होती. अखेर सचिनच्या विनंतीवरुन नेटकऱ्यांनी या व्यक्तीला शोधून काढले आहे. सचिनने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये आपण एका वेटरला शोधत असल्याचं म्हटलं होतं. मला या वेटरला शोधण्यास मदत करा असंही सचिन म्हणाला होता. अखेर हा वेटर ज्या हॉटेलमध्ये काम करायचा त्याच हॉटेलने सचिनला या वेटरबद्दल माहिती दिली आहे.

शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सचिनने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला होता. “नकळत झालेली भेट ही संस्मरणीय ठरु शकते. मी एका कसोटी मालिकेदरम्यान चेन्नईमधील ताज कोरोमॅण्डल या हॉटलेमध्ये थांबलेलो असताना एका कर्मचाऱ्याला भेटलो होतो. त्यावेळी आम्ही माझ्या एल्बो गार्डसंदर्भात चर्चा केली होती. या चर्चेनंतर मी माझे एल्बो गार्ड नव्याने बनवून घेतले आणि त्याचा मला फायदा झाला. मी आता विचार करतोय की तो कर्मचारी कुठे असेल. त्याला भेटण्याची मला इच्छा आहे. मला तुम्ही त्याला शोधण्यास मदत कराल का?,” असं ट्विट सचिनने केलं होतं.

“एकदा आम्ही कसोटी दौऱ्यादरम्यान चेन्नईमध्ये असताना माझी भेट एका हॉटेल कर्मचाऱ्याशी झाली. मी माझ्या रुमवर कॉफी मागवली होती. त्यावेळी वेटर रुममध्ये आला. त्याने मला तुमच्याशी क्रिकेटसंदर्भात काहीतरी बोलायचं आहे. आपण जरा बोलू शकतो का अशी विचारणा त्या वेटरने माझ्याकडे केली,” असं सचिन या ट्विटबरोबर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतो. “मी त्याला हो बोल ना असं सांगितलं. जेव्हा जेव्हा तुम्ही आर्म गार्ड घालता तेव्हा तुमच्या बॅटची हलचाल थोडी मंदावते. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. मी तुमची फलंदाजी अगदी मन लावून पाहतो. मी अनेकदा तुमच्या खेळीतील बॉल अन् बॉल ५ ते ७ वेळा रिवाईण्ड करुन पाहिले आहेत. त्यातूनच मला हे जाणवलं असं त्या वेटरने मला त्यावेळी सांगितलं होतं,” अशी आठवण सचिनने सांगितली. “त्याचे निरिक्षण अचूक होते. मी त्याला होय खरं आहे तुझं असं उत्तर दिलं. जगातील तू एकमेव व्यक्ती आहे ज्याच्या ही गोष्ट लक्षात आली आहे असंही मी त्याला सांगितलं. त्यानंतर मी रुमवरुन मैदानात गेलो. मी माझ्या एल्बो गार्डची डिझाइन बदलली आणि त्याचा आकार हवा तेवढा करुन घेतला. त्यामध्ये मला हवे त्याप्रमाणे पॅडिंग टाकले आणि खरोखर त्याचा मला फायदा झाला. तो माझ्या खेळातून जाणवू लागला,” असं सचिन या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतो. या सल्लानंतर सचिनने आपल्या एल्बो गार्डचे डिझाइन बदलून घेतले आणि त्याच्या फलंदाजीच्या शैलीमध्ये सुधारणा झाली.

जवळजवळ १८ तासांनंतर सचिनच्या या ट्विटवर ताज हॉटेलने ट्विट करुन उत्तर दिले. “सचिन तेंडुलकर, तुम्ही चेन्नईमधील आमच्या हॉटेलमध्ये असताना वेटरबरोबर झालेल्या गप्पांमधील आठवण शेअर केल्याबद्दल धन्यवाद! ताजची संस्कृती आणि संस्कारांचे जतन करणाऱ्या आमच्या सहकाऱ्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही त्याला शोधून काढले आहे. आणि तुमच्या दोघांची भेट घडवून आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असं ट्विट ताजच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन सचिनच्या ट्विटला उत्तर देताना करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये सचिनचा त्या वेटरबरोबरचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान, आता सचिनची आणि त्याच्या या चाहत्याची कधी भेट होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी भेट झाल्यावर सचिन किंवा ताज हॉटेलकडून याबद्दल सोशल नेटवर्किंगवर नक्कीच माहिती दिली जाईल अशी अपेक्षा सचिनच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.