scorecardresearch

टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित, प्रज्ञानंद पराभूत; अर्जुन अग्रस्थानी

सातव्या फेरीच्या सामन्यात वॅन फोरीस्टने बचावात्मक खेळ करताना विदितला धोका पत्करण्यास भाग पाडले.

विक अ‍ॅन झी (हॉलंड) : भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीला टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. सातव्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फोरीस्टने त्याच्यावर मात केली. तसेच विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने भारताच्या आर. प्रज्ञानंदला पराभूत केल्याने विदितला अग्रस्थान गमवावे लागले.

सातव्या फेरीच्या सामन्यात वॅन फोरीस्टने बचावात्मक खेळ करताना विदितला धोका पत्करण्यास भाग पाडले. विदितने ३६व्या चालीत केलेल्या चुकीचा फायदा घेत वॅन फोरीस्टने विजय मिळवला. विदितचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. 

कार्लसनने ३४ चालींत प्रज्ञानंदवर मात केली आणि पाच गुणांसह अग्रस्थान पटकावले. अझरबैजानचा शख्रियार मामेदेरोव्ह दुसऱ्या, तर विदित, आंद्रे इसिपेन्को, अनिश गिरी, रिचर्ड रॅपपोर्ट संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहेत.

चॅलेंजर विभागात भारताच्या अर्जुन इरिगेसीला कझाकस्तानच्या रिनात जुमाबायेव्हने बरोबरीत रोखले. या निकालानंतर अर्जुन सहा गुणांसह अग्रस्थानी कायम आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata steel masters chess tournament vidit pragyananda defeated arjun in the forefront akp