Team India Playing 11 Prediction: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंघममध्ये रंगणार आहे. भारतीय संघाला मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान सामन्याआधी सहाय्यक प्रशिक्षक रायन डे डोशेटने प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळणार, याबाबत मोठी हिंट दिली आहे.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ५ पैकी ३ कसोटी सामने खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, ते ३ सामने कोणते? हे स्पष्ट झालेलं नाही. पत्रकार परिषदेत बोलताना रायन डे डोशेटने सांगितलं की, जसप्रीत बुमराह बर्मिंघम कसोटीसाठी उपलब्ध आहे. पण तो खेळणार आहे की नाही याबाबत त्याने कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. यासह दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी आणि २ फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश केला जाऊ शकतो, अशी हिंट रायन डे डोशेटने दिली आहे.
कोणत्या फिरकी गोलदाजांना संधी मिळणार?
भारतीय संघात फिरकी गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजाला संधी दिली जात आहे. तर दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरचा पर्याय उपलब्ध आहे. वॉशिंग्टन सुंदर हा गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. याबाबत बोलताना रायन डे डोशेट म्हणाला की, ” प्लेइंग ११ मध्ये २ फिरकी गोलंदाजांना स्थान दिलं जाण्याची शक्यता जास्त आहे. कोणत्या २ गोलंदाजांना संधी दिली जाईल याबाबत निर्णय घेतला जाईल. तिन्ही फिरकी गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. वॉशिंग्टन चांगली फलंदाजी करतोय. आम्ही नक्कीच अष्टपैलू खेळाडूला खेळवण्याचा प्रयत्न करू.”
दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ११ मध्ये आणखी एक मोठा बदल केला जाऊ शकतो. अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. शार्दुल पहिल्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीतही फ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी दिली जाऊ शकते. नितीश आल्याने फलंदाजीतील खोली आणखी वाढेल यासह त्या गोलंदाजीही करू शकतो.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल, ऋषभ पंत, करूण नायर, रविंद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज